पुण्यात शनिवारी ७५ जणांवर कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:10 AM2021-01-02T04:10:48+5:302021-01-02T04:10:48+5:30
पुणे : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोरोना लसीला भारतात आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या ...
पुणे : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोरोना लसीला भारतात आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील ७५ लोकांवर शनिवार (दि. २) रोजी कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम (ड्राय रन) करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. भगवान पवार यांनी दिली.
पवार यांनी शुक्रवारी (दि. १) सांगितले, “कोरोना लसीकरण मोहिमेच्या रंगीत तालमीचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड या प्रत्येक ठिकाणच्या २५ लोकांची रंगीत तालिम अनुक्रमे जिल्हा औंध रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र (माण, ता. मुळशी) आणि जिजामाता आरोग्य केंद्र (पिंपरी-चिंचवड) येथे होणार आहे. लसीकरणासाठी आवश्यक सर्व तयारी, ‘ॲप’वर माहिती भरणे आदीची रंगीत तालीम होणार आहे.”
जिल्ह्यात आत्तापर्यंत ३ लाख ६२ हजार ९७९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून ८ हजार ८०० लोकांचे कोरोनामुळे मृत्यु झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात सरकारी व खाजगी क्षेत्रातील सर्व म्हणजे सुमारे सव्वा लाख लोकांना ही लस देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सर्व वयोवृद्ध लोक आणि अन्य आजार असलेल्या लोकांना तर तिसऱ्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे.