विणीचा हंगाम असल्याने माळरानांवर भुरळ घालतोय रंगीत 'सरगोटा' - शुष्क प्रदेशाचा राजा, माळरानं कमी होत असल्याने अधिवास होतोय नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:10 AM2021-04-19T04:10:44+5:302021-04-19T04:10:44+5:30
हिवाळा सरल्यानंतरची माळरानं किंवा शुष्क प्रदेशावर फक्त ओसाड आणि तप्त भोवळ पाडणारी उन्हं नि तापणारी भेगाळलेली जमीन दिसते. आणि ...
हिवाळा सरल्यानंतरची माळरानं किंवा शुष्क प्रदेशावर फक्त ओसाड आणि तप्त भोवळ पाडणारी उन्हं नि तापणारी भेगाळलेली जमीन दिसते. आणि अशा वेळीच बाहेर पडतो तो या शुष्क प्रदेशाचा राजा सरगोटा सरडा; ज्याला रंगीत गळ्याचा सरडा म्हणजेच फॅन थ्रोटेड लिझर्ड असेही संबोधतात. हा सरडा प्रदेशनिष्ठ असून केवळ भारत, नेपाळ आणि श्रीलंका येथे आढळतो. सध्या माळरानं कमी होत असल्याने याचा अधिवास धोक्यात आला आहे, अशी माहिती वन्यजीव अभ्यासक अनिता किंद्रे यांनी ‘लोकमत’ला दिली.
भारतात आढळणारे सर्वच सरगोटे हे २०१६ पर्यंत 'सिटाना' या एकाच जातीमध्ये वर्गीकृत केले होते, त्यानंतर डॉ. व्ही. दिपक, डॉ. वरद गिरी आणि त्यांच्या इतर सहसंशोधकांनी भारतामध्ये या सरगोट्याची एक नवीन जाती नि त्याच्या पाच नवीन प्रजातींचा शोध लावला. भारतात आता 'सिटाना' आणि 'सरडा' या दोन जातींचे सरगोटे दिसतात. त्यानंतरही काही नवीन प्रजातींचा शोध लागल्याने या दोन जातींच्या मिळून १२ प्रजाती भारतात आढळतात, असे किंद्रे यांनी सांगितले.
सरगोट्याच्या कृती माळरानावर पाहण्यासारख्या असतात. अनेक वेळेस मागच्या दोन पायांने हा सरडा चालत किंवा धावत असतो आणि दोन पायांवर उभा राहून परीसराशी टेहाळणी करताना आढळतो.
उन्हं कमी झाल्यावर संध्याकाळच्या सुमारास सरगोटे बाहेर येऊन आपलं खाद्य शोधायला सुरवात करतात. यांचे खाद्य म्हणजे मुंगी, वाळवीसारखे कीटक, गोगलगाय, नाकतोडे, गवताच्या बिया.
मिलनानंतर मादी जमिनीमध्ये दगडांच्या आडोशाला एक लहान खड्डा करून त्यात अंडी घालते आणि त्यावर माती लोटून खड्डा पुन्हा पूर्ववत करते. साधारण 39 दिवसांच्या उबवणी काळानंतर या अंड्यामधून सरड्याची पिल्ले बाहेर येतात, मॉन्सून जणू काही त्यांचे आनंदाने या भूतलावर स्वागत करतो.
—————
विणीच्या काळात गळ्यावर रंगीत पिशवी
नर व मादी दोन्ही सारखेच दिसतात, पण विणीच्या काळात म्हणजेच मार्च ते जून च्या दरम्यान नराच्या गळ्याला आकर्षक तीन रंगांची पिशवी दिसू लागते. ही पिशवी किंवा पंखा चमकदार मोरपंखी निळा, काळा आणि लालसर नारिंगी रंगाचा दिसतो. विणीच्या काळात नर स्वतःचा परिसर स्थापित करण्याकरिता रंगीत पंखा फुगवून दुसऱ्या नरांना आपल्या परिसरातून जाण्याची सूचना देतात.
———————————————-
अधिवास जपणे आवश्यक
सरड्यांचे दुरून फोटो काढणे, नोंदी ठेवणे, निरीक्षण करण्यापर्यंत हे ठीक आहे पण याचा त्या जीवांना त्रास तर होत नसेल ना याची काळजी घेणं आवश्यक आहे. शहरीकरण, रस्तेवाढ, बांधकामे, खाणकाम तसेच माळरानाचे शेतात रूपांतर करण्याने देखील आपली गवताळ माळरानं दिवसेंदिवस कमीकमी होत चालली आहेत. माळरानं हा अधिवास पर्यायाने कमी होत चालला आहे.
- अनिता किंद्रे, वन्यजीव अभ्यासक
------------------