बहारदार गायनाने रंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2016 12:23 AM2016-05-09T00:23:45+5:302016-05-09T00:23:45+5:30
डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरियल फाउंडेशनद्वारा आयोजित संगीत महोत्सव प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे सुरू झाला. बहारदार गायन सादर झाले.
चिंचवड : डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरियल फाउंडेशनद्वारा आयोजित संगीत महोत्सव प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे सुरू झाला. बहारदार गायन सादर झाले.
डॉ. वसंतरावांचे सुपुत्र बापू देशपांडे व फाउंडेशनचे विश्वस्त प्रभाकर लेले, अनंत दामले, अध्यक्ष डॉ. रवींद्र घांगुर्डे यांनी डॉ. वसंतरावांच्या प्रतिमेस अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला.
अंकिता जोशी यांनी गायन केले. सभेची सुरुवात राग भीमपलासीमधील ‘तन दीनो मन दीनो’ या बडा ख्यालाने झाली. जोड बंदीश ‘जा जारे अपने मंदीरवा’ यानंतर त्यांनी ‘राहिले ओठांतल्या ओठात’ हे डॉ. वसंतरावांचे गीत सादर करीत गायन समाप्ती केली. त्यांना साथसंगत संवादिनी अभिनव खंदे, तबला - प्रसाद करंबळेकर, तानपुरा- राजश्री देवळे व गीतांजली हराळ-पाटील अशी होती.
ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर, विजय वसंतराव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र घांगुर्डे यांनी प्रास्ताविक केले.
गोव्याचे डॉ.शशांक मक्तेदार यांचे गायन झाले. त्यांनी राग कामोदमधील विलंबित झुमरा तालातील ‘मनी मालनीयाँ’ बंदीश, त्यानंतर ‘कारे जाने ना दुंगी’ हा छोटा ख्याल, राग बहारदारमधील ‘सुधे सुगंध’ ही बंदीश सादर करून गायनसमाप्ती केली. त्यांना तबला साथ विघ्नहरी देव, संवादिनी साथ लीलाधर चक्रदेव, तानपुरासाथ डॉ. चारुदत्त देशपांडे व दर्शन कुलकर्णी यांनी केली.
मध्यंतरानंतर श्रुती भावे (व्हायोलिन) व वरद कठापूरकर (बासरी) कलाकारांचे वादन झाले. त्यात प्रथम मारुबिहाग राग त्यानंतर मिश्र पिलूची धून व शेवटी ‘बगळ्यांची माळ फुले’ हे वसंतरावांचे गीत सादर केले ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांचे गायन झाले. शास्त्रीय संगीतासोबत नाट्य संगीत, भावगीत यावर हुकुमत असलेल्या आशातार्इंनी राग जोग कंसमधील ‘कैसे गुनगाऊ तुमरे’ या बडाख्यालाने केली. जोड बंदीश ‘मैं तो आयो तोरे द्वार’ ही होती.
हिंदी भाषेतील टप्पा, सोहनी रागातील रचना व पाठोपाठ दोन
तराणे व रसिकाग्रहास्तव ‘सुरत पियाँ की’ हे नाट्यगीत सादर केले. संवादिनीसाथ लीलाधर चक्रदेव, तबलासाथ प्रसाद करंबळेकर यांनी केली. अरुण चितळे व स्नेहल कोकीळ यांनी सूत्रसंचालन
केले. (वार्ताहर)