रंगभूषाकार निर्व्यसनी, चारित्र्यसंपन्न असावा: माधव वझे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:09 AM2021-04-15T04:09:21+5:302021-04-15T04:09:21+5:30
पुणे : रंभूषाकार हा सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न, निर्व्यसनी असणे फार आवश्यक असते. संवेदनाक्षम रंगभूषाकार प्रभाकर भावे यांच्या सत्त्वशील वर्तणुकीमुळे सर्व ...
पुणे : रंभूषाकार हा सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न, निर्व्यसनी असणे फार आवश्यक असते. संवेदनाक्षम रंगभूषाकार प्रभाकर भावे यांच्या सत्त्वशील वर्तणुकीमुळे सर्व कलाकारांना त्यांच्याविषयी आदर व विश्वास वाटत आला आहे. प्रभाकर भावे हे त्यांच्या हातातील जादूई कलेने, स्वत:च्या कर्तृत्वाने वेगळ्या उंचीवर पोहोचले आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ नाट्य समीक्षक माधव वझे भावे यांच्याविषयी गौरवोद्गार काढले.
ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे उदया (दि. 15) वयाची 75 वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला संवाद पुणेतर्फे बुधवारी (दि. 14) भावे यांचा वझे यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. वेळी ते बोलत होते. संवाद पुणेचे सुनील महाजन, भावे यांच्या पत्नी सुहासिनी भावे उपस्थित होते.
भावे यांच्या पुण्यातील उमेदीच्या काळातील आठवणींना उजाळा देताना वझे म्हणाले की, रंगभूषा करताना रंगभूषाकाराला कलाकारांच्या अगदी समीप राहावे लागते. अशा वेळी कलाकाराच्या मनात रंगभूषाकाराविषयी खात्री-विश्वास असणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. प्रभाकर भावे यांच्या सत्त्वशील वर्तणुकीमुळे सर्व कलाकारांना त्यांच्याविषयी आदर व विश्वास वाटत आला आहे. ’रंगभूषा’या भावे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रभाकर भावे यांचे मनोगत त्यांच्या पत्नी सुहासिनी भावे यांनी वाचून दाखविले. कलेचा वारसा कुटुंबातूनच मिळाला आहे. मी रंगभूषाकार म्हणून घडताना मला वडिलांचे तसेच अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत गेले. राजाभाऊ नातूंमुळे मला रंगभूषाकार म्हणून ओळख मिळाली. आकाशाला गवसणी घालणारी अनेक माणसे मला गुरुस्थानी लाभली हे मी माझे भाग्य समजतो. कुटुंबातील सदस्यांनी या क्षेत्रातील वाटचालीत वेळोवेळी प्रोत्साहन दिले असल्याचे भावे यांनी आवर्जून सांगितले.
वलय मुळगुंद यांनी सन्मानपत्राचे लेखन केले आहे. मुक्ता पाध्ये यांनी त्याचे वाचन केले.