उलगडले ग्रामीण जीवनाचे रंग; ‘व्हिलेज लाईफ’ प्रदर्शनाचे दिनकर थोपटे यांच्या हस्ते पुण्यात उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:46 PM2018-01-10T12:46:53+5:302018-01-10T12:53:45+5:30
चित्रांमुळे ग्रामीण जीवनाचे विविध रंग उलगडले. निमित्त होते चित्रकार दत्तात्रेय शिंदे यांनी काढलेल्या ग्रामीण जीवनावर आधारित चित्रांच्या ‘व्हिलेज लाईफ’ चित्रप्रदर्शनाचे.
पुणे : चित्रप्रदर्शनाद्वारे ग्रामीण जीवनाचे दर्शन आज पुणेकरांना घडले. ग्रीष्म ऋतूत लालबुंद फुलांनी बहरलेला गुलमोहोर... वसंत ऋतूमध्ये विविध रंगांनी नटलेला निसर्ग... कौलारू घराच्या अंगणात बागडणाऱ्या कोंबड्या... सोनेरी रंगाची उधळण करणारी खेड्यातील रम्य सायंकाळ या चित्रांमुळे ग्रामीण जीवनाचे विविध रंग उलगडले. निमित्त होते चित्रकार दत्तात्रेय शिंदे यांनी काढलेल्या ग्रामीण जीवनावर आधारित चित्रांच्या ‘व्हिलेज लाईफ’ चित्रप्रदर्शनाचे.
या प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन शिल्पकार दिनकर थोपटे यांच्या हस्ते झाले. या वेळी जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्सचे डीन प्रा. विश्वनाथ साबळे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक नंदकुमार सागर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, मार्तंड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त राजकुमार लोढा आदी उपस्थित होते.
थोपटे म्हणाले, ‘‘प्रदर्शनात चित्रांमध्ये लहान मुले, प्राणी आणि ग्रामीण जीवनातील विविध क्षण, सौंदर्य पाहायला मिळते. खेड्यातील निसर्ग, तेथील माणसे, प्राणी, खेड्यातील घरे असे ग्रामीण जीवनातील विविध पैलू चित्रांच्या माध्यमातून दिसले. असे चित्र काढणे अवघड आहे.
खेड्यातील अनेक विद्यार्थ्यांमध्ये कला दडलेली असते; परंतु ती पुढे आणण्यासाठी त्यांना कोणताही पाठिंबा मिळत नाही. कलाकार कलानिर्मितीबरोबर राष्ट्रनिर्मितीचे कामदेखील करीत असतो.’’
साबळे म्हणाले, ‘‘आपल्यामध्ये कोणतीही कला असो तीमध्ये सातत्य टिकवणे गरजेचे आहे. कलावंत हा संवेदनशीलतेने काम करीत असतो. हे खूप महत्त्वाचे आहे. आपली कला जोपासणे हे काम आहे.’’
गायकवाड म्हणाले, ‘‘मी एक कलाकार आहे. जीवनात एक तरी कला अवगत असली पाहिजे. एक छंद म्हणून कला जोपासली पाहिजे.’’
प्रदर्शनात ७५ चित्रांचा समावेश असून खेड्यातील घरे, डोंगर, गाई, मेंढ्या, बकरी, झोपड्या, धनगरांची पाले अशा प्रकारची चित्रे रेखाटली आहेत. याच विषयावर आधारित जेजुरी, सासवड, ओतूर, जुन्नर या परिसरातील चित्रे प्रदर्शनात पाहायला मिळतात. खेड्यातील निसर्ग, माळराने अशी ग्रामीण जीवनशैली आपल्या कलेद्वारे कागदावर उमटवली आहेत.
- दत्तात्रेय शिंदे