दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी एकत्र यावे : मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 21:15 IST2020-01-28T16:38:48+5:302020-01-28T21:15:34+5:30
शिक्षण, विज्ञान आणि संशोधन यांच्या समन्वयातून विद्यार्थी निर्माण करावयाचे आहेत.

दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी एकत्र यावे : मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक
पुणे: ‘वाढत जाणाऱ्या दहशतवादी घटनांना थोपविण्यासाठी जगातील सर्व लोकांनी एकत्रित येऊन त्याचा नायनाट करावा लागेल. तरच जगातील सर्व नागरिक सुखी व समाधानी होतील. वसुधैव कुटुंबकमची शिकवण देणारा भारत हा संपूर्ण विश्व आपले मानतो.’असे प्रतिपादन केंद्र्रीय मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केले.
भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या वतीने विज्ञान भवन नवी दिल्ली येथे २० ते २३ फेब्रुवारी २०२० या कालावधीत १० व्या भारतीय छात्र संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. या करीता कोथरूड येथील एमआयटी कॅम्पसवर लोकशाहीचा घंटानाद डॉ. निशंक यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.यावेळी एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ कराड,कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू प्रा.डॉ.एन.टी.राव, प्र-कुलगुरू प्रा.डी.पी. आपटे व भारतीय छात्र संसदेचा राष्ट्रीय समन्वयक विराज कवाडिया, एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्टुडंट कौन्सिलचा अध्यक्ष अविनाश टेंबे व जनरल सक्रेटरी हिमांशू चौधरी उपस्थित होते.
शिक्षण, विज्ञान आणि संशोधन यांच्या समन्वयातून शिक्षण देऊन असे विद्यार्थी निर्माण करावयाचे आहेत,असे नमूद करून निशंक म्हणाले,‘आपल्या नेतृत्व गुणांच्या आधारे संकटांवर मात करतील असे विद्यार्थी घडविणे हाच केंद्र्र सरकारचा मुख्य उद्देश आहे. तरूणांनी स्वप्ने पहायला शिकावे आणि त्यांना सत्यात उतरविण्याचा प्रयत्न करावा. भारत हा विश्व गुरू असून तो पुढेही राहणारच. त्याकरीता तरूणांचा सहभाग महत्वाचा आहे.’