पुढच्या वर्षी लवकर या...! पुण्यात पाच दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 09:28 PM2021-09-14T21:28:41+5:302021-09-14T21:37:43+5:30
सोन्याच्या पावलांनी वाजतगाजत घरोघरी विराजमान झालेल्या गौरीचेंही विसर्जन करण्यात आले
पुणे : ’गणपती बाप्पा मोरया; पुढच्या वर्षी लवकर या' च्या जल्लोषात पाच दिवसांच्या गणपतींना निरोप देण्यात आला. ’सोन्याच्या पावलांनी’ वाजतगाजत घरोघरी विराजमान झालेल्या गौरीचेंही विसर्जन करण्यात आले. भाविकांनी उत्साहाच्या भरात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करू नये यासाठी नदीकाठचा रस्ता बंद करून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे घरच्या घरी बादलीमध्ये तसेच महापालिकेकडून करण्यात आलेल्या फिरत्या हौदामध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करून नागरिकांनी नियमांचे पालन केले तर काहींनी मूर्तीदान करण्यावर भर दिल्याचे दिसून आले. लाडक्या बाप्पाला निरोप देताना ’जगाला करोनाच्या संकटातून मुक्त करून पुढच्या वर्षी लवकर या, अशी प्रार्थना भाविकांनी केली.
’श्रीं’चे घरोघरी आगमन झाल्यावर चौथ्या दिवशी गौरी विराजमान होतात आणि पाचव्या दिवशी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून सायंकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडतो. यंदाच्या वर्षी नऊ दिवसांचा गणेशोत्सव असल्यामुळे गौराईंचे तिस-या दिवशीच घरात आगमन झाले. सोमवार हा दिवस पूजेचा असल्याने परंपरेनुसार सकाळ, दुपार आणि सायंकाळच्या टप्प्यात गौरी गणपतीची पूजा करून महानैवेद्य दाखविण्यात आला. घरांमध्ये तसेच सोसायट्यांमध्ये दोन्ही दिवस हळदी-कुंकू समारंभ उत्साहात पार पडले. आरती, नैवेद्य आणि दोरे घेऊन गौरींचा सण मंगळवारी पार पडला.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गणेश मूर्तीचे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करण्यावर बंधने आल्यामुळे नागरिकांनी घरामध्येच बादलीत विसर्जन करावे, असे आवाहन सरकार आणि महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. त्यानुसार अनेकांनी घरामध्येच बादलीत गणेश मूर्तीचे विसर्जन केले. काही नागरिकांनी महापालिकेने साकारलेल्या फिरत्या हौदांमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन केले. काहींनी मूर्ती दान देण्याचा मार्ग अवलंबला. काहींनी घरीच गणेश मूर्ती तयार करताना, त्यात काही बियांचे रोपण केले होते. घरातील कुंडीमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करून अनेकांनी अंकुर गणेशाच्या माध्यमातून पर्यावरणप्रेमाचे उदाहरण समोर ठेवले. गौरी गणपतीला निरोप देताना भाविक भावूक झाले होते.