Monkeypox Virus: मंकीपाॅक्सबाधित देशांतून आलात; ही घ्या काळजी! राज्याने जारी केल्या मार्गदर्शक सूचना
By ज्ञानेश्वर भोंडे | Updated: August 19, 2024 18:41 IST2024-08-19T18:40:57+5:302024-08-19T18:41:21+5:30
सध्या जगात विविध देशांत मंकीपाॅक्सचे रुग्ण वाढत आहेत, स्वीडनमध्ये रुग्ण वाढले असून, पाकिस्तानमध्येही एक आढळला आहे

Monkeypox Virus: मंकीपाॅक्सबाधित देशांतून आलात; ही घ्या काळजी! राज्याने जारी केल्या मार्गदर्शक सूचना
पुणे : गेल्या तीन आठवड्यांत मंकीपाॅक्सबाधित देशांमधून प्रवास करून राज्यात आलेल्या व्यक्तींच्या शरीरावर अचानक पुरळ उठणे, सुजलेल्या लसिका ग्रंथी, ताप, डाेकेदुखी, अंगदुखी, प्रचंड थकवा अशी एक किंवा अनेक लक्षणे असल्यास ते मंकीपाॅक्सचे संशयित रुग्ण समजावेत. त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात जे येतील त्यांना संभाव्य रुग्ण समजावे. तसेच ज्यांचे प्रयाेगशाळेत निदान झाले, त्यांना मंकीपाॅक्सचे रुग्ण समजण्यात यावे व त्यांच्यावर उपचार व सर्वेक्षण करण्यात यावे, असे निर्देश राज्याचे साथराेग विभागाचे सहसंचालक डाॅ. राधाकिशन पवार यांनी सर्व जिल्ह्यांना दिले आहेत.
सध्या जगात विविध देशांत मंकीपाॅक्सचे रुग्ण वाढत आहेत. स्वीडनमध्ये रुग्ण वाढले असून, पाकिस्तानमध्येही एक आढळला आहे. आतापर्यंत जगात २७ हजारांहून अधिक रुग्ण वाढले आहेत. जागतिक आराेग्य संघटनेने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे शेजारच्या पाकिस्तानात एक रुग्ण आढळल्याने भारताचीही चिंता वाढली आहे. पाकिस्तानातील ३४ वर्षीय रुग्ण साैदी अरबमधून परतला हाेता. आपल्याकडे संसर्ग हाेऊ नये यासाठी देशाच्या केंद्रीय आराेग्य विभागाने बैठक घेऊन राज्यांनाही प्रतिबंधात्मक सूचना दिल्या आहेत.
आराेग्य विभागाने जारी केलेल्या निर्देशामध्ये म्हटले आहे की, एकजरी संशयित रुग्ण आढळला तरी त्याचा त्या भागात उद्रेक समजून त्या रुग्णाची तपासणी करावी. त्यांचे नमुने (रक्त, रक्तद्रव, पुरळमधील द्रव आणि मूत्र) राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही)कडे तपासणीला पाठवावेत आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचेही सर्वेक्षण करावे. तसेच ज्या शहरांत आंतरराष्ट्रीय विमानतळे, बंदरे आहेत तेथे सर्वेक्षण आणि विलगीकरण यंत्रणा कार्यान्वित करावी.