आ. गोपीचंद पडळकर यांनी केले अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:11 AM2021-02-13T04:11:38+5:302021-02-13T04:11:38+5:30
पहाटे साडेपाचच्या सुमारास आ. पडळकर आणि शेकडो कार्यकर्त्यांनी जेजुरी गडावरील पायरी मार्गालगत उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला. ...
पहाटे साडेपाचच्या सुमारास आ. पडळकर आणि शेकडो कार्यकर्त्यांनी जेजुरी गडावरील पायरी मार्गालगत उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि मार्तंडदेव संस्थांनच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापट ही झाली. कार्यकर्त्यांनी चौथऱ्यावर जाऊन पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र पुतळ्याच्या चौथऱ्यावर त्यांना जाऊ दिले नाही. यावेळी शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. आ. पडळकर यांनी पुतळ्यासमोरच जाहीर सभा घेत शरद पवार आणि अहिल्यादेवी यांची व्यक्तिमत्वात खूप फरक आहे. शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट नेत्याच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन होणे म्हणजे अहिल्यादेवींचा अपमान असल्याचे सांगत त्यांनी पुतळ्याचे अनावरण झाल्याची घोषणा केली.
या पार्श्वभूमीवर देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त सॉलिसिटर प्रसाद शिंदे यांनी मात्र पुतळ्याचे अनावरण आणि लोकार्पण उद्याच ठरलेल्या वेळी शरद पवार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
आज पहाटेच पोलिसांशी हुज्जत घालीत अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी जायचे असे सांगून चौथऱ्यावर जाण्याचा प्रयत्न आ. गोपीचंद पडळकर व कार्यकर्त्यांनी केला. यावेळी पोलिसांनी पुतळ्याचे अनावरण उद्या होणार असून त्यानंतर पुतळा दर्शनासाठी खुला केला जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यांना चौथऱ्यावर जाऊ दिले नाही. यावेळी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न संबंधिताकडून करण्यात आला. पोलिसांशी हुज्जत घालून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांकडून आ. गोपीचंद पडळकर, माऊली हाळणवर, जयंत सलगर आणि नवनाथ (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आलेले असून फुटेज तपासून अजून ही काही जणांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती बारामती अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली आहे. जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरीत मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे