आता तरी यावं शहाणपण! पुण्यात एक नाही तर अनेक 'फॅशन स्ट्रीट' आहेत दुर्घटनांच्या उंबरठ्यावर....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 06:24 PM2021-03-27T18:24:06+5:302021-03-27T18:34:14+5:30
फॅशन स्ट्रीटसारखेच मार्केट पुण्यातल्या अनेक भागांमध्ये उभे राहिले आहेत.
प्राची कुलकर्णी -
पुणे : फॅशन स्ट्रीटसारखेच मार्केट पुण्यातल्या अनेक भागांमध्ये उभे राहिले आहेत. पण बांधकाम विभाग आणि अतिक्रमण विभाग यांच्यापैकी कारवाई करायची तरी नेमकी कोणी या वादात इथली अतिक्रमणं मात्र दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत.
पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावर फॅशन स्ट्रीटसारखेच तीन मार्केट उभे राहिले आहेत. इथली दुकानं इतकी दाटीवाटीने लावली आहेत की नुसतं उभ राहिलं तरी गुदमरायला व्हावं. हे मार्केट उभे राहिले ते गेल्या काही वर्षातच. आधी मुख्य रस्त्यावर टपऱ्या आल्या. आणि पाठोपाठ हा रस्ता शॉपिंग डेस्टिनेशन झाला. हे होता होताच उभी राहिली ती ही शॉपिंग मार्केट. केसरिया लेन, शिरोळे मार्केट आणि हॉंगकाँग लेन या तिन्ही ठिकाणी आता जवळपास प्रत्येकी ५० च्यावर दुकाने आहेत. आजूबाजूला जागा करत हे मार्केट दिवसागणिक वाढत आहे.
थाटलेल्या दुकानांचा असा भूलभुलैया तयार झाला आहे की एखादी दुर्घटना झाली तर त्यातून वाचणं देखील कठीण आहे. 'फॅशन स्ट्रीट' येथील आगीच्या दुर्घटनेनंतर इथल्या दुकानदारांच्या मनात देखील ही भीती स्पष्ट दिसतेय.
पण याबाबत विचारल्यावर ते म्हणतात "अशी कोणती घटना होऊ नये म्हणून आम्ही दररोज पूर्ण तयारी करतो. इथे दुकानांमध्ये फायर एक्स्टिंग्विशर ठेवले आहेत. तसेच आम्ही रात्री जाताना पण दुकानासमोर पाणी मारून जातो."
ही तीन मार्केट तर ऐन शहरातली प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. पण तुळशीबागेपासून ते इतर अनेक ठिकाणी अशा मार्केट चा रूपाने अतिक्रमणाचा विळखा पडलेला पाहायला मिळतो आहे. पण यावर कारवाई करण्यासाठी मात्र महापालिकेचे दोन विभाग एकमेकांकडे बोट दाखवतात. अतिक्रमण विभागाचा मते ही जबाबदारी बांधकाम विभागाची आहे. तर बांधकाम विभागाचा मते अतिक्रमण कारवाई होणे आवश्यक आहे. या वादात या मार्केट मध्ये दुकानांची संख्या मात्र वाढतेय. आता फॅशन स्ट्रीट दुर्घटनेनंतर तरी या अतिक्रमणावर काही कारवाई होते का ते पाहावे लागेल.