राजकारणविरहित विकासासाठी एकत्र या
By admin | Published: May 8, 2017 02:04 AM2017-05-08T02:04:52+5:302017-05-08T02:04:52+5:30
विकासाच्या माध्यमातून महात्मा फुलेंचे खानवडी गाव जगाच्या नकाशावर पोहोचावे, यासाठी या गावचा आदर्श सांसद ग्राम योजनेत
लोकमत न्यूज नेटवर्क
खळद : विकासाच्या माध्यमातून महात्मा फुलेंचे खानवडी गाव जगाच्या नकाशावर पोहोचावे, यासाठी या गावचा आदर्श सांसद ग्राम योजनेत सहभाग करून सर्वांगीण विकास करण्यासाठी गावातील सर्व नागरिकांना राजकारणविरहित विकासासाठी एकत्र या, असे आवाहन खासदार अमर साबळे यांनी केले.
आदर्श सांसद ग्राम योजनेअंतर्गत त्यांनी खानवडी गावाची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांशी चर्चा करून लोकसहभागासाठी तयारी आहे का, याची विचारणा केली. या वेळी सर्वांनी एकमुखाने होकार दर्शविल्यावर या गावचा आदर्श सांसद ग्रामचा तपशील पुरंदरचे तहसीलदार जिल्हाधिकारी यांना पाठवतील. त्यानंतर तो पंतप्रधान कार्यालयाकडे जाईल. तेथे यावर गावच्या निवडीविषयी चर्चा होऊन मगच निवडीची घोषणा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी झालेल्या बैठकीत ग्रामपंचायतीच्या वतीने साबळे यांना गाव दत्तक घेण्याविषयी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार सचिन गिरी, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, सरपंच दीपाली होले, उपसरपंच वैजयंता झुरंगे, सुनील धिवार, सचिन लंबाते, गिरीश जगताप, साकेत जगताप, शेखर वढणे, आनंद जगताप, संदीप जगताप, गोकुळ गायकवाड, पी. एस. मेमाणे, चंद्रकांत टिळेकर, श्रीकांत ताम्हाणे तसेच ग्रामस्थ व अधिकारी उपस्थित होते.
खानवडीत म. फुले यांच्या नावाने बहुउद्देशीय सभागृह उभारावे. तसेच गावचा सर्वांगीण विकास होईल, असा प्रयत्न व्हावा, असे दत्ता झुरंगे यांनी सांगितले. गावात आदर्श ग्रामयोजना खऱ्या अर्थाने राबवायची असेल तर गावातील प्रत्येक व्यक्तीने ही योजना यशस्वी होण्यासाठी काम केले पाहिजे, असे पिंपरी-चिंचवडचे माजी आयुक्त के. सी. कारकर यांनी सांगितले. खानवडी येथे फुले यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, असे सुनील धिवार, चंद्रकांत फुले यांनी सांगितले.