लहान मुलांमधील फ्लूसदृश आजारांचे ‘कमबॅक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:08 AM2021-07-22T04:08:54+5:302021-07-22T04:08:54+5:30
पावसाळा अनेक आजारांना आमंत्रण देतो. पावसाळ्यातील आजारांचे मुलांमधील प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याने शासकीय आणि खासगी ...
पावसाळा अनेक आजारांना आमंत्रण देतो. पावसाळ्यातील आजारांचे मुलांमधील प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याने शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागातील बालरुग्णांची संख्याही वाढली आहे. कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक ठरणार असल्याचा अंदाज यापूर्वी बांधला गेल्याने पालक धास्तावले आहेत. मात्र, कोरोनाच्या भीतीने पालकांनी घाबरून जाऊ नये, सध्या दिसणारी लक्षणे केवळ फ्लूची आहेत, असा दिलासा डॉक्टरांनी दिला आहे.
पावसाळ्यात दूषित पाणी, ओलसर हवा, अन्नपदार्थांमधील रासायनिक प्रक्रिया अशा अनेक कारणांमुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब, सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशी लक्षणे मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे सर्वजण धास्तावले होते. त्यामुळे मुले, मोठी माणसे यांचे घराबाहेर पडणे बंद झाले होते. त्यामुळे गेल्या वर्षी मुलांमध्ये विषाणूजन्य आजारांचे प्रमाण नगण्य होते. मात्र, आता दुसऱ्या लाटेचा वेग कमी झाल्यावर दैनंदिन जीवन सुरळीत होऊ लागले आहे. मुले खेळण्यासाठी, शिकवणीसाठी घराबाहेर पडू लागली आहेत. त्यामुळे पुन्हा विषाणूजन्य आजारांनी डोके वर काढले आहे.
-------------------
पालकांनी घाबरू नये
गेल्या आठवड्यापासून बालरुग्णांमध्ये निश्चित वाढ झाली आहे. त्यांच्यामध्ये इन्फ्लूएंझा आणि आरएसव्ही या विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, सध्याचे आजार चार-पाच दिवसांमध्ये आटोक्यात येत आहेत. लहान मुलांना वयानुरूप पॅरासिटॅमॉलच्या डोसने बरे वाटत आहे. गरज भासल्यासच प्रतिजैविके दिली जात आहेत. बालदमा असलेल्या मुलांचा आजारही बळावत आहे. मुले आजारी असल्यास पालकांनी त्यांना भरपूर पाणी पिण्यास सांगावे. आहारात फळांचा रस, पेज, सूप अशा द्रव पदार्थांचा समावेश करावा. कोरोनाच्या भीतीने पालकांनी घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही.
- डॉ. प्रमोद जोग, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना
--------------
मोठ्यांनीही घ्यावी काळजी
खोकला, अतिसार, ताप, डोकेदुखी, त्वचेवर पुरळ उठणे, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, मळमळ होणे, भूक न लागणे आणि पोटदुखी अशी लक्षणे मोठ्या माणसांमध्ये आढळून येत आहेत. लोकांनी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे आणि हातांची स्वच्छता अशा कोविड -प्रोटोकॉलचे पालन केले पाहिजे. वारंवार स्पर्श केलेल्या पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरण करा आणि आजारी लोकांच्या आसपास रहाणे टाळा. घरी रहा, सुरक्षित रहा.
- डॉ. मुकेश बुधवानी, जनरल फिजिशियन