'कोरोना ' नंतर कोमेजले मनोरंजन विश्व..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:11 AM2021-03-07T04:11:22+5:302021-03-07T04:11:22+5:30
पुणे : कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने नाट्यगृहे बंद केली, त्या घटनेला १५ मार्च २०२१ रोजी एक वर्ष होईल. तेव्हापासून ...
पुणे : कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने नाट्यगृहे बंद केली, त्या घटनेला १५ मार्च २०२१ रोजी एक वर्ष होईल. तेव्हापासून मनोरंजन विश्वाची गाडी घसरली असून ती अजून पूर्वपदावर आलेली नाही. नाट्यगृहे बंद झाल्याच्या घटनेचा परिणाम सांस्कृतिक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर झाला. पडद्या पुढील आणि पडद्या मागील कलावंत, तंत्रज्ञ, रंगमंच कर्मचारी यांच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. हजारो बेरोजगार झाले.
कलावंतांचे उत्पन्न कमी झाल्यामुळे आर्थिक, मानसिक, कौटुंबिक, शारीरिक अडचणींना तोंड द्यावे लागले. काहींना आजारपण वाढल्याने आर्थिक बोजा वाढल्याने मानसिक त्रास झाला. नैराश्य वाढले.
आठ महिन्यांनंतर शासनाने नाट्यगृहांना ५० टक्के उपस्थितीत कार्यक्रम करण्यास परवानगी दिली. त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रांत उत्साह वाढला. थोडे दिवस झाल्यावर प्रेक्षक देखील येऊ लागले. पण तो आनंद फार काळ टिकला नाही. जानेवारीपासून कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने चिंता वाढली.
आता पुन्हा कलाकारांची कोंडी झाली आहे. रोजच्या रोज काम केले तरच घर चालेल अशी परिस्थिती असलेला एक वर्ग या क्षेत्रात आहे. या वर्गावर जणू कुऱ्हाड कोसळली आहे. पन्नास टक्के उपस्थितीत चालणारे नाटकाचे खर्च भागत नाहीत. तरीही सर्व घटकांनी समजून उमजून काम केले. अनेक ठिकाणी भाडी कमी घेतली गेली. कलाकारांनी मानधन कमी घेतले. जाहिरातींचे दर कमी केले गेले. पण, एवढे करूनही रसिक मात्र नाट्यगृहात पुरेशा संख्येने आले नाहीत. अजूनही रसिकांच्या मनातील कोरोनाची दहशत कमी झालेली नाही.
चित्रपटगृहे बंद आहेत. एक पडदा चित्रपटगृहे, मल्टीस्क्रिन चित्रपटगृहे सुरू झालेली नाहीत. अनेक संस्था आणि कलाकारांनी ऑनलाईन कार्यक्रम सुरू केले. मात्र, रंगमंचीय कार्यक्रमांचा जिवंतपणा त्यात येत नाही. प्रेक्षकांनाही पुरेसे समाधान मिळत नाही. त्यामुळे ऑनलाईन कार्यक्रम हा जिवंत, प्रत्यक्ष कार्यक्रमांना पर्याय होऊ शकत नाही.
आता तर प्रेक्षकांनाही घरातील मनोरंजनाची सवय लागली आहे. पैसे खर्च करून नाट्यगृहांकडे येण्याची सवय कमी झालेली आहे, ती उत्तरोत्तर कमी होत जाणार आहे. डोळ्यांसमोर घडणारे जिवंत नाट्य अनुभवायचे तर नाट्यगृहांना पर्याय नाही. मात्र, पैसे खर्च करून नाट्य गृहांकडे येण्याची सवय कमी होणार का? अशी भीती आहे. मनोरंजन विश्वातील जिवंतपणा, कलेचा आनंद परत यावा अशी सर्वांचीच इच्छा आहे. तसे घडेपर्यंत नटेश्वराकडे प्रार्थना करणे, हेच आपल्या हातात आहे.