दिलासा...ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:10 AM2021-05-29T04:10:30+5:302021-05-29T04:10:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत असताना मात्र ग्रामीण भागात ही संख्या वाढत होती. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत असताना मात्र ग्रामीण भागात ही संख्या वाढत होती. यामुळे चिंतेचे वातावरण होते. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी हॉय अॅलर्ट, अलर्ट अशी गावांची वर्गवारी करण्यात आली. याचे परिणाम चांगले झाले असून शहरापाठोपठ ग्रामीण भागातही रुग्णवाढीचा आलेख गेल्या आठवड्यापासून कमी होत आहे. शुक्रवारी ग्रामीण भागात १ हजार ४३१ रूग्ण आढळले. तर हॉटस्पॉट गावांची संख्या आठ दिवसांत ४६५ वरून कमी होऊन ३५७ वर आली आहे.
ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. मोठ्या गावांपुरती मर्यादित असलेली रुग्णसंख्या ही वाड्यावस्त्यांपर्यंत जाऊन पोहचली होती. यामुळे शहरापेक्षा ग्रामीण भागात रूग्ण आढळण्याचे प्रमाण जास्त होते. यामुळे जिल्हा प्रशासनाने ही वाढती रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी हाय अलर्ट आणि अलर्ट गावे तसेच हॉटस्पॉट गावे अशी वर्गवारी करण्यात आली होती. वाढत्या रूग्णसंख्येमुळे हॉटस्पॉट गावांची संख्या ही दोन आठवड्यापूर्वी ४२७ एवढी होती. मात्र, प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे ही संख्या घटून ३५७ एवढी झाली आहे.
आठवड्यातील रुग्णवाढीचा दर बघता ग्रामीण भागातील रूग्णसंख्या ही कमी होत आहे. २२ मे रोजी नगर परिषद आणि ग्रामपंचायती मिळून २ हजार ३९ रूग्णसंख्या होती. २३ तारखेला त्यात घट होऊन १ हजार ७२४ एवढी रुग्णसंख्या झाली. ही घट पुढेही कायम राहिली. गुरूवारी केवळ १ हजार ३१८ रूग्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळले. शुक्रवारी १ हजार ४३१ रूग्ण जिल्ह्यात आढळले.
आतापर्यंत ४४२ गावांनी कोरोनाला हरवत गावे कोरोनामुक्त केली आहे. तर ४२ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले आहे. हाय अलर्ट, अलर्ट गावाच्या संख्याही टप्याटप्याने कमी होत आहे. ग्रामीण भागात लसीकरण केंद्रावर दुसरा डोसला प्राधान्य देत लसीकरण सुरू आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने काही केंद्रावर लसीकरण पूर्ण होऊन लस शिल्लक राहत आहे.
चौकट
रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्के
जिल्ह्यात रुग्ण होण्याचे प्रमाण चांगले आहे. जवळपास ९२ टक्के दर बरे होणाऱ्या रूग्णांचा आहे. शुक्रवारी २१ हजार ७७१ चाचण्या करण्यात आल्या. त्या पैकी पुणे,पिंपरी व ग्रामीण भाग मिळून२ हजार ५९२ बाधित रुग्ण आढळले आहेत.
चौकट
नियमांमध्ये शिथिलता तरी काळजी आवश्यक
शुक्रवारी आरोग्यमंत्र्याच्या बैठकीत शनिवार आणि रविवारचा लॉकडाऊन उठवण्यात आला. ११ पर्यंत जिवनावश्यक दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. यामुळे गर्दी वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बाहेर न पडता कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन करत नियम शिथिल करण्यात आले तरी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.