बैठकीला या.. नाहीतर निलंबन करण्याचा शिक्षणाधिकाऱ्यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 08:11 PM2019-02-03T20:11:31+5:302019-02-03T20:17:34+5:30
यशदा येथे होणाऱ्या बैठकीत प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पुणे : शिक्षण भरती प्रक्रियेअंतर्गत पवित्र संकेतस्थळावर सुरू असलेले काम, खासगी अनुदानित शिक्षकांचे समायोजन, आंतरजिल्हा बदल्या आदी मुद्यांवर चचेर्साठी सोमवारी (दि. ४) राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची यशदा येथे बैठक होणार आहे. या बैठकीला गैरहजर राहिल्यास संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ही बैठक बहुप्रतिक्षेतील भरती प्रक्रियेला होत असलेल्या विलंबामुळे महत्वाची ठरणार आहे.
शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आधी बिंदुनामावली निश्चित करावी लागणार आहे. त्यासाठी पवित्र संकेतस्थळावरून हे काम केले जात आहे. मात्र, अद्यापही अपेक्षित प्रगती झालेली नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेला विलंब होत चालला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहित लागण्यापुर्वी ही प्रक्रिया पुर्ण करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. पण सध्या होत असलेल्या विलंबामुळे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. यापार्श्वभुमीवर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची आज होणारी बैठक महत्वाची मानली जात आहे. ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडून आढावा घेतला जाणार आहे.
यशदा येथे होणाऱ्या बैठकीत प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. या बैठकीत राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली, खाजगी अनुदानित शिक्षकांचे समायोजन, पवित्र पोर्टल आदी बाबींचा आढावा घेण्यात येणार आहे. गैरहजर राहणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांना तात्काळी निलंबित करून त्यांच्याविरूध्द शिस्तभंगाची कारवाई केली जावी, असे स्पष्ट आदेश अवर सचिव प्रि. शं. कांबळे यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, या बैठकीनंतर तरी भरती प्रक्रियेच्या पुर्वतयारीला वेग येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही प्रक्रिया लांबल्यास आचारसंहितेपुर्वी भरती पुर्ण होणे अशक्य असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.