हळूहळू येतोय...! मॉन्सून २ दिवसांत कर्नाटकात दाखल होणार; लवकरच महाराष्ट्रात येणार
By श्रीकिशन काळे | Published: May 31, 2024 04:25 PM2024-05-31T16:25:54+5:302024-05-31T16:26:47+5:30
येत्या दोन दिवसांमध्ये माॅन्सून अरबी समुद्राचा आणखी काही भाग मॉन्सून व्यापणार
पुणे: सध्या मॉन्सून वेगाने पुढे वाटचाल करत असून, पुढील दोन दिवसांमध्ये कर्नाटक राज्यामध्ये येईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. राज्यामध्ये पुढील २ दिवस काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, काही भागात पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
माॅन्सूनची दररोज वाटचाल होत असून, शुक्रवारी देखील काही भागात वाटचाल झाली आहे. बंगालचा उपससागरातील आणखी काही भागांमध्ये माॅन्सून दाखल झाला आहे. तर त्रिपुरा, मेघालय आणि आसामचा संपूर्ण भाग माॅन्सूनने व्यापला आहे. तसेच हिमालयाकडील पश्चिम बंगालचा आणि सिक्कीमचा बहुतांशी भागही माॅन्सूनने व्यापला असून, माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान तयार आहे. येत्या दोन दिवसांमध्ये माॅन्सून अरबी समुद्राचा आणखी काही भाग व्यापेल. मॉन्सून केरळ आणि लक्षद्वीप, कर्नाटकचा काही भाग, तमिळनाडूचा आणखी काही भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भाग व्यापेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला.
राज्यामध्ये काही भागात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा राहील. शुक्रवारी (दि.३१) वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट दिलेला आहे. कोकणातील रत्नागिरी पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबई तसेच पुढील २ दिवस उष्णतेच्या लाटेचा असेल, असाही अंदाज दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनूसार शनिवारी आणि रविवारी पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. सोमवारी (दि.३) संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र, तसेच कोकणातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
मॉन्सूनला पुढील वाटचाल करण्यासाठी पोषक वातावरण तयार आहे. त्यामुळे कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग तो व्यापेल. - डॉ. अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ, पुणे