पोलीस स्मृती दिनानिमित्त शोक कवायत; महिला तुकडीने वाहिली शहीद पोलिसांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 03:35 PM2017-10-21T15:35:12+5:302017-10-21T15:58:43+5:30
कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेल्या देशभरातील ३७९ पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना पोलीस स्मृति दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली़. कवायतीत पुणे शहर पोलीस आयुक्तालयामधील एका महिला तुकडीने सहभाग घेतला.
पुणे : आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेल्या देशभरातील ३७९ पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना पोलीस स्मृति दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली़ पाषाण येथील महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधन केंद्रात आयोजित केलेल्या शोक कवायतीत पुणे शहर पोलीस आयुक्तालयामधील एका महिला तुकडीने सहभाग घेतला होता़
लडाख येथे २१ आॅक्टोंबर १९५९ या दिवशी हॉटस्प्रिंग या कडाक्याच्या थंडीच्या ठिकाणी सुसज्ज चिनी सैन्याने केंद्रीय निमलष्करी पोलीस दलाच्या १० शूर शिपायांच्या तुकडीवर पूर्व तयारीनिशी अचानक हल्ला केला़ त्यावेळी त्या १० शूर वीरांनी शत्रुशी निकराने लढत देऊन देशासाठी आपले देह धारातिर्थी ठेवले़ तेव्हापासून २१ आॅक्टोबर हा दिवस देशातील विविध पोलीस दलाच्या वतीने पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो़ पोलीस स्मृतिदिनाचे दिवशी एकाचवेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाचे ठिकाणी मागील एका वर्षाचे कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले, त्या सर्वांना आदरांजी वाहण्यात येते़
महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधन केंद्र येथील पोलीस हुतात्मा स्मृति स्मारकावर सकाळी गुप्तचर विभागाचे सेवानिवृत्त संचालक विद्याधर वैद्य यांनी तसेच पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, अपर पोलीस महासंचालक संजयकुमार, कारागृह महानिरीक्षक भुषणकुमार उपाध्याय, बिनतारी संदेश विभागाचे अपर पोलीस महासंचालक रितेशकुमार, संजीवकुमार सिंघल, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम इत्यादी वरिष्ठ अधिकारी यांनी पुष्पचक्र अर्पण केले़
या शोक कवायतीमध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील दोन तुकड्या, राज्य राखीव पोलीस दलाच्या २ तुकड्या, लोहमार्ग व पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या २ तुकड्या अशा ६ तुकड्यांनी व वाद्यवृंद्यानी सहभाग घेतला़ परेड कमांडर सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे व राखीव पोलीस उपनिरीक्षक महेश साळवी यांनी कवायतीचे नेतृत्व केले़.
वीरगती प्राप्त झालेल्या महाराष्ट्रातील पोलीस कॉन्स्टेबल सुरेश तेलामी यांच्यासह ३७९ जवानांच्या यादीचे वाचन सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे, सतीश पाटील यांनी केले़ कार्यक्रमाला सेवानिवृत्त पोलीस अधिकारी ए़ डी़ जोग, अशोक धिवरे, ग्यानचंद वर्मा, सुरेश खोपडे तसेच पोलीस अधीक्षक सुवेझ हक, सह आयुक्त साहेबराव पाटील, अपर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, रवींद्र सेनगांवकर, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सुधीर हिरेमठ, अशोक मोराळे तसेच पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक पोलीस फौजदार सिताराम नरके यांनी केले़