पुण्यात मनसेच्या महाआरतीच्या महानियोजनास सुरूवात; भोंगे काढण्याबाबत पोलिसांना कळवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 06:43 PM2022-04-20T18:43:37+5:302022-04-20T18:43:46+5:30
राज ठाकरे यांनी आदेश दिल्याप्रमाणे ३ मे ला अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर शहरातील सर्व मंदिरांमध्ये सायंकाळी महाआरती करण्याच्या नियोजनास मनसेचे पुण्यातील कार्यकर्ते लागले आहेत
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आदेश दिल्याप्रमाणे ३ मे ला अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर शहरातील सर्व मंदिरांमध्ये सायंकाळी महाआरती करण्याच्या नियोजनास मनसेचे पुण्यातील कार्यकर्ते लागले आहे. याबाबतची बैठक पक्ष कार्यालयात न घेता शहरातील दुसऱ्याच एका ठिकाणी घेण्यात आली.
बैठकीत शहरातील सर्व मंदिर प्रमुखांशी संपर्क साधून त्यांना महाआरती करण्यास सांगण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी आसपासचे रहिवासी उपस्थित राहतील याची काळजी मनसेचे कार्यकर्ते घेतील असे ठरवण्यात आले. प्रामुख्याने सर्व मोठ्या मंदिरांमध्ये त्यादिवशी सायंकाळी महाआरती होईलच याची काळजी घेण्यासाठी तसे नियोजन करण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला.
दरम्यान भोंग्यांबाबतची राज ठाकरे यांनी ३ मे हीच अखेरची मुदत दिली आहे. त्यामुळे त्याच दिवशी महाआरती करायची तर मग भोंग्यांचे काय करायचे असा प्रश्न बैठकीत एका पदाधिकाऱ्याने विचारला. त्यावर अशा भोंगे असलेल्या ठिकाणांची यादी त्या त्या हद्दीच्या पोलिस ठाण्यात देण्याचा व त्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्याचेही बैठकीत ठरले. हनुमान चालिसा लावण्याबाबतही दक्ष राहण्याचे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले.
पक्षाध्यक्षांच्या आदेशाप्रमाणे ३ मेला पुण्यातील सर्व लहानमोठ्या मंदिरांमध्ये महाआरती होईल. त्याचे नियोजन आम्ही करत आहोत. कार्यकर्ते त्यासाठी तयार आहेत. पोलिस आयुक्तांना आम्ही त्याबाबत रितसर निवेदन देणार आहोत असे हेमंत संभूस (प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता) यांनी सांगितले.