धार्मिक स्थळे पाडण्यावरून भाजपावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 01:52 AM2018-12-18T01:52:11+5:302018-12-18T01:52:39+5:30
सर्वपक्षीय सदस्य आक्रमक : सत्ताधाऱ्यांकडून प्रशासन धारेवर, मोगलाई करीत असल्याचा हल्ला
पुणे : शहरातील अनधिकृत प्रार्थनास्थळे रात्रीच्या वेळी परिसरातील कुटुंबांच्या घरांना बाहेरून कड्या लावून पाडण्याच्या प्रशासनाच्या धोरणावर सोमवारी महापालिकेच्या सभेत सर्वपक्षीय सदस्यांना हल्ला चढवला. आयुक्त सौरभ राव यांनी न्यायालयाच्या यातील भूमिकेबाबत खुलासा केल्यानंतर मात्र सर्व सदस्य शांत झाले. या विषयावर पक्षनेत्यांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यात भूमिका ठरविण्याचा निर्णय महापौरांनी दिला.
राजेश येनपुरे, प्रकाश कदम, महेश वाबळे, दत्ता धनकवडे, उमेश गायकवाड, अश्विनी कदम, अजित दरेकर, गफूर पठाण, राजश्री शिळीमकर, शंकर पवार, अजय खेडकर, अविनाश साळवे, दिलीप वेडे पाटील, मंजूषा नागपुरे, आदित्य माळवे, आरती कोंढरे, सुशील मेंगडे यांनी चर्चेत भाग घेतला. भाजपाचे सदस्य प्रशासनावर टीका करीत होते, तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी भाजपाला ‘तुमचीच सत्ता आहे ना सगळीकडे; मग तुम्हाला न सांगता मंदिरे पाडलीच कशी?’ याच सवालावर जोर दिला. काँग्रेसच्या अरविंद शिंदे यांनी अयोध्येत मंदिर बांधण्याच्या गोष्ट करता व इथे मात्र मंदिरे पाडत आहात, अशी टीका केली. चेतन तुपे यांनी घाटे म्हणतात त्याप्रमाणे मोगलाईच सुरू असल्याचा व तीसुद्धा सत्ताधाºयांच्या आशीर्वादाने, असा आरोप केला. विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी महापौरांनी याबाबत भूमिका जाहीर करावी, अशी मागणी केली. संजय भोसले, वसंत मोरे यांचीही भाषणे झाली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी प्रशासनाने याचा खुलासा करावा,असे सांगत रात्री कारवाई करणे अयोग्यच आहे, असे मत व्यक्त केले.
आयुक्त म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई सुरू आहे. सरकारकडून त्याचा रोज पाठपुरावा होतो. त्यांना दर महिन्याच्या ५ तारखेला न्यायालयाला अहवाल द्यावा लागतो. या प्रकरणात सरकारी आदेशाप्रमाणेच कारवाई करण्यात येत आहे. सन २००९च्या नंतरची कोणताही अनधिकृत प्रार्थनास्थळे ठेवायची नाहीत. त्याआधीच्या सन १ मे १९६० पासूनच्या प्रार्थनास्थळांची अ ब क अशी वर्गवारी करायची होती. ती करून त्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे.’’
अ वर्गात अनधिकृत आहे पण लोकमान्यता आहे, पाडता येणार नाही, जमीनमालकाची हरकत नाही पण वाहतुकीला अडथळा आहे अशी प्रार्थनास्थळे स्थलांतरित करायची, ब वर्गात लोकमान्यता आहे, वाहतुकीला अडथळा नाही; पण जमीनमालकाची हरकत आहे, अशी स्थलांतरित करायची व क वर्गातील जी अनधिकृतच आहेत, वाहतुकीला अडथळा ठरत आहेत, पदपथावरच बांधली गेली आहेत अशी पाडायची होती. पुणे शहरात अ मध्ये १३५, ब मध्ये ६१ व क मध्ये ५४२ प्रार्थनास्थळे आहेत. ती पाडण्याचे काम सुरू आहे. सदस्यांच्या भावना लक्षात घेतल्या तरी यात न्यायालयाचा थेट हस्तक्षेप असल्यामुळे कारवाई करण्यात येत आहे.
- सौरभ राव, आयुक्त
धीरज घाटे यांनी मालमत्ता व्यवस्थापन विभागाने कोणाची किती प्रार्थनास्थळे आहेत याची माहिती सभागृहाला द्यावी, अशी मागणी केली. त्याला अरविंद शिंदे यांनी हरकत घेतली. सभागृहात अशी धार्मिक विभागणी करणे अयोग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. खुद्द न्यायालयाने प्रार्थनास्थळे असा शब्द वापरला आहे. यातच सर्वांची हे आले आहे, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष जगताप यांनी बोलताना मुख्यमंत्र्यांविषयी अवमानकारक शब्द वापरले, असा आरोप करीत भाजपाचे सर्व सदस्य त्यांच्यावर तुटून पडले. माफी मागितल्याशिवाय बोलू देणार नाही, असा आग्रह त्यांनी धरला. जगताप यांनी ‘ते वक्तव्य माझे नाही, मी ऐकलेले फक्त सांगितले आहे,’ असा बचाव केला व त्यामुळे माफी मागणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे भाजपाचे सदस्य संतप्त झाले. चेतन तुपे, अरविंद शिंदे, दिलीप बराटे आदींनी जगताप यांची समजूत घातली. महापौरांनी अखेर त्यांना बोलणे बंद करून खाली बसण्यास सांगितले. यावर जगताप परत चिडले.
हा विषय संवेदनशील आहे, त्यामुळे यावर पक्षनेत्यांबरोबर स्वतंत्र बैठक घेण्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी जाहीर केले. प्रशासनाने न सांगता पाडण्याची कारवाई केली, हे चुकीचेच झाले. क वर्गात असलेल्या ५४२ प्रार्थनास्थळांचे काय करायचे ते बैठकीत ठरवावे लागेल, असे त्यांनी सांगितले. सभागृहाच्या प्रेक्षा गॅलरीत गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची सभेदरम्यान गर्दी झाली होती. त्यामुळे मंडळात सल्लागार असणाºया नगरसेवकांना या विषयावर बोलताना सोमवारी भलताच जोर आला होता.
मोगलाई असल्याप्रमाणे मंदिरांवर रात्रीच्या सुमारास स्वारी करण्यात आली. कोणी मध्ये पडू नये, यासाठी परिसरातील घरांना बाहेरून कडी लावण्यात आली. हा महाभयंकर प्रकार आहे. कोणाच्या आदेशावरून हे कृत्य करण्यात आले त्याचा खुलासा व्हावा.
- धीरज घाटे, भाजपाचे नगरसेवक