वाणिज्य शिक्षण : वेळ संधीचे सोने करण्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:10 AM2021-05-27T04:10:32+5:302021-05-27T04:10:32+5:30
व्यापार, उद्योग, औद्योगिक व सेवा क्षेत्रावर दूरगामी परिणाम झाले आहेत. त्यातून आर्थिक व सामाजिक प्रश्न आणि आव्हाने उभी ...
व्यापार, उद्योग, औद्योगिक व सेवा क्षेत्रावर दूरगामी परिणाम झाले आहेत. त्यातून आर्थिक व सामाजिक प्रश्न आणि आव्हाने उभी राहिली आहेत. साधारणपणे व्यापारचक्र ठप्प झाल्याने उलाढालीच्या पलीकडे लहान-मोठ्या सर्वच उद्योगांना कमी-अधिक प्रमाणात विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
कामगार कपात व पगारातील कपात, कर्जाची परतफेड, त्यावरील व्याज, माल पुरवठादारांची देणी देखभाल व दुरुस्तीचा अतिरिक्त खर्च, किमान कायमखर्च, बदललेले प्राधान्यक्रम, करांचे ओझे, आवक व जावक ताळमेळातून होणारी ओढाताण, तर दुसरीकडे प्रत्येक कुटुंबात काहीशी अशीच परिस्थिती आहे. याचा व्यापक परिणाम या सर्वच घटकांवर झाला आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्यार्थ्यांना उपलब्ध स्वयंरोजगार आणि रोजगारासंबंधी नव्याने विचार करावा लागणार आहे. शैक्षणिक अर्हता व किमान कौशल्यांसोबत इतर घटकांचा विशेष विचार करून त्याप्रमाणे गुण, कौशल्यांचे संवर्धन व जोपासना करावी लागणार आहे. उत्तम अभ्यासक्रम, त्यात कालानुरूप बदल, विद्यार्थी केंद्रित अध्ययन व अध्यापन पद्धती, पारदर्शक मूल्यमापन, प्रशासन आणि एकूणच शैक्षणिक प्रकियेत कालसुसंगत आवश्यक संगणक/तंत्रज्ञानाचा वापर आणि सार्वजनिक हिताची जोपासना शैक्षणिक समूहांना सांभाळावी लागेल. चिकित्सक अभ्यास, विश्लेषण क्षमता, विविध कामे करण्याची क्षमता, बहुभाषी व सांस्कृतिक वातावरणात कार्यक्षमतेने कार्यरत राहण्याची तयारी आणि जागतिक गुणवत्ता, स्पर्धक, किंमतधोरण, उत्पादनातील नावीन्याची जाण या गुणांची पायाभरणी करण्यासाठी विविध शैक्षणिक आयुधांचा वापर करून विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकसित करावे लागणार आहे. म्हणजेच प्रवेशित विद्यार्थी हा बाजारपेठीय आवश्यकतेनुसार घडवावा लागेल. जेणे करून त्याचा बौद्धिक पातळी बुद्ध्यंक, भावनिक बुद्ध्यंक, सामाजिक बुद्ध्यंक, प्रतिकूल परिस्थितीत विवेकी निर्णयाचा बुद्ध्यंक योग्य प्रकारे विकसित होईल, असा जाणीवपूर्व प्रयत्न करावा लागेल. हे करताना आजच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत ''एक्यू''कडे सर्वाधिक लक्ष द्यावे लागणार आहे. कारण कौटुंबिक आणि व्यावसायिक गरजा आणि प्राधान्यक्रम बदललेले आहेत. ज्यामध्ये अनावश्यक खर्चावर नियंत्रण, उपलब्ध स्रोतांचा पर्याप्त वापर, पर्यायी उत्पादन घटकांचा शोध व वापर, नवीनतेचा ध्यास, आरोग्यदायी कामाचे वातावरण, आधुनिक पण कामगार हितेषी तंत्रज्ञानाचा वापर, स्थानिक ते जागतिक बाजार पेठेचा कल विचारात घेऊन उत्पादन व सेवांची स्पर्धात्मक किमतीत निर्मिती अशी आव्हाने पेलण्यासाठी नेतृत्व व सक्षम मनुष्यबळ पुरवण्याची जबाबदारी ही शैक्षणिक समूहांची आहे.
वाणिज्य शाखेने बदलांचा आढावा घेऊन नव्याने सज्ज होण्याची हीच योग्य वेळ आहे. प्रत्येक प्रवेशित विद्यार्थ्यांची कलचाचणी घेऊन समुपदेशकाकडून मार्गदर्शन व कृती आराखडा करणे गरजेचे आहे .
१) अभ्यासक्रम पुनर्रचनेसोबत व्यवहार्य अंमलबजावणी उपयुक्त होईल.
२) पारंपरिक अभ्यासाबरोबर मूल्यवर्धित श्रेयांक पद्धतीत सर्टिफिकेट ,पदविका अभ्यासक्रमांची मुबलक उपलब्धता.
३) पदवी व पुढील अभ्यासक्रमांना किमान ६ महिने ते १ वर्ष ॲप्रेन्टेनशिप सुट्टीच्या काळात अनिवार्य.
४) अभ्यासपूरक व अभ्यासेतर उपक्रमातून व्यक्तिमत्त्व विकास. आजच्या विज्ञान व ज्ञानयुगामध्ये जीवन धकाधकीचे, तणावाचे व गतिमान झाल्याने स्पर्धा तीव्र ,गळेकापू झाली आहे. यंत्र, संगणक, मोबाईलच्या अतिरेकी वापराने शारीरिक हालचाली कमी झाल्यात त्यामुळे मानसिक स्वास्थ्य कमकुवत होत आहे. याकडे लक्ष द्यावे लागेल.
५) महाविद्यालयीन स्तरावर आंतरविद्याशाखीय विषयांचे अध्ययन अध्यापन महत्त्वाची भूमिका बजावू शकते. विविध शाखांतील वेगवेगळ्या विषयांचे शिक्षक एकत्र येऊन शैक्षणिक कृती ठरवतात. ज्या योगे विद्यार्थ्यांना विद्याशाखा व विषयांच्या भिंती पार करून विषयांचे बहुआयामी आकलन होऊन, प्रश्नांची हाताळणी व सोडवणूक चांगल्या प्रकारे करता येते. विषयांच्यापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना विविध विषयांमधील परस्परसंबंध, त्यातील बारकावे, एकाच विषयाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन अभ्यासणे, अनुभवण्याची संधी उपलब्ध होते. भविष्यकालीन समस्या सोडवण्यासाठी याची नितांत गरज आहे.
६) संशोधनसातत्य, विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावर कायम स्वरूपी संशोधन कक्ष स्थापून सातत्याने आर्थिक ,सामाजिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घटकातील बदलांचा आढावा व अभ्यास करून त्याप्रमाणे शैक्षणिक प्रक्रियेतील बदल सुचवावे. विविध सर्वेक्षण, संशोधनात विद्यार्थ्यांचा सहभाग करून संशोधनाच्या आयुधांची ओळख, वापरकरण्याची संधी उपलब्ध करून देणे. संशोधन संस्कार करून कार्यपद्धतीचा आवश्यक भाग अशी प्रथा रुजविणे नितांत गरजेचे आहे.
हे करणे प्रचलित रचनेत सोपे नाही. किंबहुना कठीण व आव्हानात्मक आहे, तरीही प्रारंभ करून श्रीगणेशा करण्याची ही संधी साधायला हवी तरच वाणिज्य व व्यवस्थापन शाखेची उपयुक्तता अधोरेखित होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी मार्ग तयार न करता त्यांना कोणत्याही मार्गासाठी तयार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर्वांनी करावा.
- डॉ.सी. एन. रावळ,
माजी प्राचार्य, बीएमसीसी, पुणे