वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांची दूरशिक्षणला अधिक पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 01:03 PM2019-09-25T13:03:14+5:302019-09-25T13:07:48+5:30
दूरस्थ अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्वतंत्र पोर्टल सुरू केले असून आत्तापर्यंत सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत
पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाने बहि:स्थ अभ्यासक्रम बंद करून मुक्त अध्ययन प्रशालेमार्फत दूरस्थ अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना येत्या ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. मात्र, पुण्यातील नामांकित महाविद्यालयांमधील दूरशिक्षण केंद्रातील वाणिज्य शाखेच्या पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व जागा भरल्या आहेत. त्यामुळे महाविद्यालयांकडून वाढीव जागांची मागणी केली जात आहे.विद्यापीठाने दूरस्थ अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्वतंत्र पोर्टल सुरू केले असून आत्तापर्यंत सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. विद्यार्थ्यांना मुक्त अध्ययन प्रशालेअंतर्गत बी.ए., बी.कॉम., एम.कॉम., एम.ए. अभ्यासक्रमास प्रवेश दिले जात आहेत. त्याचप्रमाणे एमबीए अभ्यासक्रमासही प्रवेश दिले जात आहे. विद्यापीठाने या प्रवेश प्रक्रियेसाठी अहमदनगर, नाशिक व पुणे जिल्ह्यातील सुमारे ५० केंद्रांना मान्यता दिली आहे. महाविद्यालयात सुरू केलेल्या केंद्रांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज जमा करायचा आहे. त्यानुसार विद्यार्थी त्यांनी निवडलेल्या नजीकच्या केंद्रात अर्ज व कागदपत्र जमा करत आहे. सुमारे ८ हजार विद्यार्थ्यांनी दूरस्थ अभ्यासक्रमासाठी अर्ज केला आहे.
विद्यापीठाने आपल्या कार्यक्षेत्रातील तीनही जिल्ह्यांत दूरस्थ अभ्यासक्रमासाठी केंद्र दिले असले तरी पुणे शहरातील काही नामांकित महाविद्यालयांतील केंद्रांमधील सर्व जागा भरल्या आहेत. विद्यापीठाने प्रत्येक केंद्राला ५० विद्यार्थी दिले आहेत. त्यात कला शाखेपेक्षा वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थ्यांकडून विचारणा होत असल्याने काही महाविद्यालयांनी दूरस्थ अभ्यासक्रमाच्या जागा वाढवून मिळाव्यात, असे पत्र विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेला पाठविले आहे. परंतु, विद्यापीठाने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही.
मुक्त अध्ययन प्रशालेच्या सल्लागार समितीचे सदस्य डॉ. संजय चाकणे म्हणाले, दूरस्थ अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सुमारे ८ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. त्यातही पुणे शहरातील नामांकित महाविद्यालयांमधील केंद्रांना दिलेल्या सर्व जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. बी.ए., बी.कॉम. या अभ्यासक्रमास प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या उल्लेखनीय आहे.
..........
दोन्ही अभ्यासक्रम वेगळे असावेत
मुक्त अध्ययन केंद्राच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम आणि पुणे विद्यापीठाचा नियमित अभ्यासक्रम एकसारखा असेल तर नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होऊ शकते. त्यामुळे दोन्ही अभ्यासक्रम वेगळे असावेत, असे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.