बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने व्यावसायिक व नागरिक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:14 AM2021-06-16T04:14:48+5:302021-06-16T04:14:48+5:30
पूर्व हवेलीतील अनेक व्यवसाय संकटात सापडले आहेत. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन ही गावे पुणे शहराच्या लगतच्या परिसरातील ...
पूर्व हवेलीतील अनेक व्यवसाय संकटात सापडले आहेत. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन ही गावे पुणे शहराच्या लगतच्या परिसरातील असल्याने या ठिकाणी व्यवसाय व नोकरीनिमित्त आलेल्यांनी गुंठे घेऊन स्वतःची घरे बनवण्याची स्वप्ने या लॉकडाऊनमुळे तुटली आहेत. त्यातच घरांच्या बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यांचे दरही गगनाला भिडल्याने आता घराचे बांधकाम करणेही महाग झाले आहे.
वाळू, वीट, स्टील व सिमेंट यांच्या दरांमध्ये लॉकडाउनच्या नंतर जवळपास २० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे नव्याने घराचे बांधकाम करणाऱ्या नागरिकांना या महागाईला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी बांधकाम साहित्याचे दर वाढल्यामुळे व्यापाऱ्यांनी मर्यादित साहित्याचा साठा करून ठेवला आहे. त्यात लॉकडाउनच्या काळात वाहतुकीवर झालेल्या परिणामामुळे इतर राज्यातून येणारे साहित्य कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यात वाळूउपसा करणारी मशीन व क्रशर मशीन तसेच त्यासाठी लागणारे केमिकल्स व कच्चा माल यांचेसुद्धा दर वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना हव्या तेवढ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध नाही. यामुळे बांधकाम करणाऱ्यांची चारही बाजूंनी कोंडी झाल्याचे चित्र दिसत आहे. या महागाईमुळे अनेकांचे घर बांधकामाचे बजेट कोलमडले आहेत. यामुळे बांधकामांनाही उशीर होत आहे. बांधकाम साहित्याचे वाढलेले दर त्यात कामगारांना द्यावी लागणारी मजुरी यांचा ताळमेळ बसत नसल्याने अनेकांनी घरांचे बांधकाम पुढे ढकलले आहे. डिझेलचे वाढलेले दर, मजुरांची कमतरता तसेच बांधकाम साहित्याचा तुटवडा यामुळे साहित्याचे दर २० ते ४० टक्क्यांनी वाढले. यामुळे बांधकाम व्यावसायिक तसेच ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे.
बांधकाम साहित्याचे दर का वाढले? लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प होते. यामुळे बांधकाम साहित्य बनवण्याचे कारखाने व मशीन यादेखील बंद होत्या. सर्व मजुरांनी घरची वाट धरल्याने काम करण्यासाठी मजुरांचा तुटवडा भासत होता. आजही या क्षेत्रात पन्नास टक्के मजुरांचा तुटवडा भासत आहे. लॉकडाउनमुळे वाहतूक ठप्प असल्याने बरेच साहित्य इतर राज्यात अडकून पडले होते. यामुळे पूर्व हवेलीत बांधकाम साहित्याची मागणी वाढली आहे. परंतु त्या तुलनेत बांधकाम साहित्याचा पुरवठा कमी होत आहे.
--
लॉकडाऊनपूर्वीचे दर स्टील -३८ ते ४० किलो
सिमेंट -२६० ते २८० प्रति बॅग
वीट-८ ते ९ प्रति नग
लॉकडाऊननंतरचे दर स्टील-५८ ते ६२ किलो
सिमेंट-३५० ते ३६० प्रति बॅग
वीट-९.५० ते १०.५० प्रति नग
कामगार वेतन लॉकडाउनपूर्वी
मिस्त्री -५०० ते ७०० दर दिवस
हेल्पर-४०० ते ५०० दर दिवस
कामगार वेतन लॉकडाउननंतर
मिस्त्री-७०० ते १००० दर दिवस
हेल्पर- ५०० ते ७०० दर दिवस.
--
कोट
लॉकडाऊनपूर्वी ठरवून घेतलेली बांधकामे बांधकाम साहित्य व कामगारांचे वाढलेले पगार यामुळे घेतलेल्या कामाच्या रकमेत व आत्ताच्या खर्चात ताळमेळ बसत नसल्याने तोटा करून कामे करावी लागत आहेत.
नरेंद्र वलटे- बांधकाम व्यावसायिक