व्यावसायिक नाटकांची पुण्यात पुन्हा नांदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:29 AM2020-12-12T04:29:18+5:302020-12-12T04:29:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेला व्यावसायिक रंगभूमीचा पडदा शुक्रवारी (११ डिसेंबर) ‘संगीत संत तुकाराम’ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेला व्यावसायिक रंगभूमीचा पडदा शुक्रवारी (११ डिसेंबर) ‘संगीत संत तुकाराम’ या नाटकाच्या नांदीने येथील बालगंधर्व सभागृहात वर गेला. या नाटकात छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांची जशी गळाभेट झाली...तशीच इतकी महिने दुरावलेल्या प्रेक्षकांची आणि नाट्यकलावंतांची नाटकाच्या माध्यमातून भेट झाली.
कलाकारांचा हुरूप, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत नाट्यगृह व्यवस्थापकांनी केलेली जय्यत तयारी आणि मायबाप रसिकांचा उत्तम प्रतिसाद अशा उत्स्फूर्त वातावरणात रसिकप्रिय सिने-नाट्य अभिनेते संजय नार्वेकर यांना सर्वप्रथम ‘तिसरी घंटा’ वाजविण्याचा बहुमान मिळाला. या नाटकात नार्वेकर यांनी तुकोबा भेटीच्या प्रवेशात ‘छत्रपती शिवाजीराजें’ची भूमिका साकारली आहे.
शासनाने ५ नोव्हेंबरला पन्नास टक्के क्षमतेने नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर बहुतांश व्यावसायिक नाटकांचा श्रीगणेशा पुण्यातूनच होत आहे. त्यामध्ये ‘ओम नाट्यगंधा-मुंबई’ निर्मित ‘संगीत संत तुकाराम’ या नाटकाचा पडदा उघडला आणि व्यावसायिक रंगभूमी रसिकांसाठी खुली झाली. नाटकाचे निर्माते ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव असून, त्यांनी नाटकात गायक-नटाची विनोदी भूमिका त्यांनी साकारली आहे.
‘राजापूरकर नाटक मंडळी’चे मालक नटश्रेष्ठ बाबाजीराव राणे यांनी हे नाटक १९१२ मध्ये रंगभूमीवर आणले. ते खूप गाजले. या नाटकाचे ''''कोरोना-लॉकडाऊन''''पूर्वी वर्षभरात महाराष्ट्रभर ८० हून अधिक प्रयोग झाले आहेत. येत्या रविवारी (१३ डिसेंबर) सायंकाळी साडेपाच वाजता अशोक पाटोळे लिखित कलाकार पुणे निर्मित ‘आई रिटायर होतेय’ हे गाजलेले कौटुंबिक नाटक तर २५ डिसेंबरला ‘ब्लाईंड गेम’ हे नाटक रसिकांच्या भेटीला येत आहे. पुणेकर रसिक या प्रयोगाला निश्चित प्रतिसाद देतील, अशी आशा ‘मनोरंजन, पुणे’चे मोहन कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
---------
“नऊ महिन्यांनी व्यावसायिक रंगभूमीचा पडदा उघडला याचा आनंद आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी बाळगूनच आम्ही प्रेक्षकांना नाट्यगृहात सोडले. प्रेक्षकांनीही नाटकाला चांगला प्रतिसाद दिला.”
- प्रवीण बर्वे, व्यवस्थापक, बालगंधर्व नाट्यगृह