आयुक्त, जिल्हाधिकारी आज स्वीकारणार पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 03:29 AM2018-04-17T03:29:51+5:302018-04-17T03:29:51+5:30
पुणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी नवलकिशोर राम मंगळवारी सकाळी आपल्या पदांचा पदभार स्वीकारणार आहेत.
पुणे : पुणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी नवलकिशोर राम मंगळवारी सकाळी आपल्या पदांचा पदभार स्वीकारणार आहेत.
कुणाल कुमार यांची केंद्रात बदली झाल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून महापालिका आयुक्तपद रिक्त होते. राव यांचीच नियुक्ती होणार याची सुरुवातीपासूनच
चर्चा होती. अखेर सोमवारी
(दि. १६) शासनाने राव यांच्यासह २८ आयएएस अधिकाऱ्यांचे बदल्यांचे आदेश काढले.
पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या बदलीनंतर पालिका आयुक्तपद रिक्त झाले होते. त्याचप्रमाणे सौरभ राव यांनी जिल्हाधिकारीपदाचा चार वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला होता. त्यामुळे पालिका आयुक्तपदी कोण येणार आणि जिल्हाधिकारीपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत गेल्या काही महिन्यांपासून चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर जिल्हाधिकारी सौरभ राव यांची बदली पालिका आयुक्तपदी करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांपासून जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यामुळे राव यांना पुणे शहराच्या प्रश्नांची माहिती आहे. राव यांनी पुणे जिल्ह्यात आपल्या कामाचा प्रभाव पाडला. मतदारयाद्या दुरुस्ती, जलयुक्त शिवार योजनेत राज्यात सर्वाधिक चांगले काम, माळीण पुनर्वसनाचे आदर्श मॉडेल, बोपखेलचा प्रश्न, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय राव यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने
हातळले आहेत. पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून राव यांच्यासमोर प्रामुख्याने शहरातील वाहतुकीचा प्रश्न, पार्किंग धोरणाची अंमलबजावणी, २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना असो, की नदी सुधार प्रकल्प, शहराचे पथारी धोरण आदी अनेक महत्त्वाच्या विषयांमध्ये ठाम भूमिका घेऊन हे सर्व प्रकल्प, योजना सर्व राजकीय पक्षांना बरोबर घेऊन पुढे घेऊन जावे लागतील.
सार्वजिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणार
- शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या पीएमपीबरोबरच मेट्रोचेही काम संयुक्तरीत्या केले जाईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होत नाही, तोपर्यंत शहराचा लिव्हेबिलिटी इंडेक्स वाढणार नाही.
- शहराची जमिनीखालील सांडपाण्याची वाहिनी जुनी झाली आहे, त्यामुळे हादेखील मोठा महत्त्वाचा विषय आहे. त्याचप्रमाणे नदी सुधार प्रकल्पही आव्हानात्मक आहे. समाविष्ट झालेल्या गावांत आधारभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल, असे राव यांनी सांगितले.