परीक्षा परिषदेच्या प्रभारी आयुक्त शैलजा दराडे निलंबित; राज्य शासनाची ५ महिन्यानंतर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 05:58 PM2023-07-23T17:58:45+5:302023-07-23T17:59:24+5:30
निलंबनाच्या कालावधीत काेणतीही खासगी नाेकरी आणि व्यवसाय करता येणार नाही
पुणे : शिक्षण विभागात नाेकरी लावण्याच्या आमिषाने उमेदवारांकडून पैसे घेत नाेकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त तथा प्रभारी आयुक्त शैलजा दराडे यांना निलंबित करण्यात आले आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनंतर राज्य शासनाच्या वतीने निलंबनाची कारवाई केली आहे.
पाेपट सुखदेव सुर्यवंशी (रा. खाणजाेडवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शैलजा दराडे (रा. पाषाण) आणि त्यांचा भाउ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. इंदापूर) या दाेघांविराेधात दि. २२ फेब्रुवारी २०२३ राेजी हडपसर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात दराडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेला अर्ज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दि. २९ एप्रिल राेजी फेटाळला हाेता.
शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दि. ७ जुलै २०२३ राेजी राज्य शासनाला याबाबत सविस्तर अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये दराडे यांनी केलेली कृती त्यांच्या कार्यपध्दतीबाबत गंभिर प्रश्न उपस्थित करणारी असल्याचे नमूद केले आहे. त्याची दखल घेत राज्य शासनाचे उपसचिव टि.वा. करपते निलंबित करण्याचे आदेश दिले. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय शैलजा दराडे यांना मुख्यालय साेडता येणार नाही. तसेच निलंबनाच्या कालावधीत काेणतीही खासगी नाेकरी आणि व्यवसाय करता येणार नाही तसे केल्यास त्या गैरवर्तवणूकीबाबत दाेषी ठरून कारवाईस पात्र ठरतील असे ही आदेशात नमूद केले आहे. दरम्यान, अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी दराडे यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.