अंदाजपत्रक सोडून आयुक्त लंडन दौऱ्यावर
By admin | Published: February 24, 2016 03:34 AM2016-02-24T03:34:16+5:302016-02-24T03:34:16+5:30
महापालिकेचे सन २०१६-१७ चे सर्वसाधारण सभेला सादर होणारे अंदाजपत्रक सोडून आयुक्त कुणाल कुमार पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासमवेत लंडन दौऱ्यावर निघाले आहेत.
पुणे : महापालिकेचे सन २०१६-१७ चे सर्वसाधारण सभेला सादर होणारे अंदाजपत्रक सोडून आयुक्त कुणाल कुमार पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासमवेत लंडन दौऱ्यावर निघाले आहेत. मावळते महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्यासह अन्य ५ जणही या दौऱ्यात सहभागी होणार असून स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी याबाबत स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करून समितीच्या बैठकीत त्याची लेखी नोंद करून घेण्यास सांगितले.
स्मार्ट सिटीसाठीचा हा २८ फेब्रुवारी ते ४ मार्च असा अभ्यास दौरा आहे. या दौऱ्याचा सर्व खर्च ब्रिटन सरकार करणार असून, तेथील कंपन्यांनी महापालिकेची ही अभ्यासू चमू तिथे आमंत्रित केली आहे. नियमामुसार अशा दौऱ्यासाठी स्थायी समितीची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे हा विषय स्थायी समितीसमोर आज ठेवण्यात आला. तोपर्यंत या विषयाची गुप्तता बाळगण्यात आली होती. आयुक्त कुणाल कुमार, मावळते महापौर धनकवडे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, उपायुक्त (विशेष) अनिल पवार, श्रीनिवास बोनाला तसेच गणेश नटराजन यांचा या दौऱ्यात समावेश आहे.
स्थायी समोर हा विषय येताच सदस्यांमध्ये कुजबुज सुरू झाली. आयुक्त कुणाल कुमार या बैठकीला उपस्थित नव्हते. विषय बाजूला ठेवला गेला, याची माहिती मिळताच ते बैठकीत उपस्थित झाले. समिती सदस्य तसेच सभागृह नेते बंडू केमसे विषय मंजूर करण्याबाबत आग्रही होते. २५ फेब्रुवारीला नव्या महापौर-उपमहापौरांची निवड होणार आहे. दौरा २८ तारखेला आहे. तरीही त्यांचे नाव न घेता मावळत्या महापौरांचे नाव दौऱ्यात घेतले गेले यावरूनही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. त्या वेळच्या उपमहापौरांना या दौऱ्यात सहभागी करून घ्या, अशी उपसूचना अविनाश बागवे यांनी मांडली. त्यासह हा विषय मंजूर करण्यात आला.
पालकमंत्री बापट यांच्याबरोबर आयुक्तांनी मध्यंतरी जपान दौरा केला. या दौऱ्याचे कवित्व त्यात सहभागी झालेल्यांवरून अजूनही सुरूच आहे. त्याही वेळी त्यांनी महापालिकेचे अंदाजपत्रक नियोजित तारखांपेक्षा पुढे ढकलले होते. आताही अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेला सादर होत असताना त्यांनी लंडन दौऱ्याचा घाट घातला आहे.
पुरुषी अहंकाराचाच प्रकार
महापालिकेत एक महिला अध्यक्ष अंदाजपत्रक सादर करतेय, याचे भान दौऱ्याचा कार्यक्रम आखताना त्यांनी ठेवायला हवे होते. मी अंदाजपत्रक सादर करीत असताना आयुक्त, मावळते महापौर व पालिकेच्या शहर अभियंत्यांसारखे महत्त्वाचे अधिकारी उपस्थित नसणार. मला वाटते हा पुरुषी अहंकाराचाच प्रकार आहे.
- अश्विनी कदम, स्थायी समिती अध्यक्ष