आयुक्तसाहेब! आता पुणेकरांचीही थाप मिळवा
By Admin | Published: June 26, 2015 04:27 AM2015-06-26T04:27:41+5:302015-06-26T04:27:41+5:30
सगळे कसे मस्तच आहे, पण म्हटले भर रस्त्यात काम करणाऱ्या, फिरणाऱ्या पोरी-बायांचीही अडचण आपल्या कानावर घालावी. झोपडपट्ट्यांत इतकी स्वच्छतागृहे
आयुक्तसाहेब, म्हणे आपण दिल्लीत जाऊन वाहवा मिळवली. झोपडपट्ट्यांतून स्वच्छतागृहाचा यशस्वी प्रयोग करून खुद्द पंतप्रधानांकडून पाठ थोपटवून घेतली. वा!वा! आनंदच आहे आम्हालाही. नाहीतर झोपडपट्ट्यांच्या आसपासही फिरायचं म्हणजे नाकाला रूमाल आलाच...पायाखालची जमीन शोधत शोधत रस्ता पार करायची नौबत ठरलेलीच. पण तुम्ही झोपडपट्ट्यांमध्ये जगणाऱ्यांच्या पोटात उठणाऱ्या वादळाचीच नव्हे, तर या वादळाने होणाऱ्या गलिच्छतेला पाहून इतरांच्या पोटात येणाऱ्या गोळ्याचीही काळजी घेण्याचा विचार केला. यासाठी तुम्ही तिथे म्हणे ६० हजार वैयक्तिक स्वच्छतागृहे उभारली. इतकेच काय तर पुणे महापालिकेचा हा आदर्श देशातील प्रत्येक शहराने घ्यावा यासाठी केंद्र शासनाने पत्रकेही छापलीत म्हणे. अगदीच बेस्ट झाले बुवा.
सगळे कसे मस्तच आहे, पण म्हटले भर रस्त्यात काम करणाऱ्या, फिरणाऱ्या पोरी-बायांचीही अडचण आपल्या कानावर घालावी. झोपडपट्ट्यांत इतकी स्वच्छतागृहे उभारलीत आणि पुण्याला अव्वल क्रमांक मिळवून दिला.. तर लगे हात आता महिलांच्याही स्वच्छतागृहांचा विचार करावा. नाही म्हणजे, तुम्ही म्हणाल महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधली आहेतच. असतील ही पण माहिती किती जणींना? ती माहीत व्हावी, यासाठी काय काय केलंय अन् जी स्वच्छतागृहे नजरेस पडतात त्यांची तरी अवस्था पाहिलीये का? पुण्यातील बहुतेक स्वच्छतागृहे ही अस्वच्छतागृहेच आहेत, याचा प्रत्यक्ष पाहणी व अनुभव घेत ‘लोकमत’ने वाचा फोडली होती. कुठे पाणी नाही तर कुठे घाणीचे साम्राज्य. कुठे कचराच तर कुठे दारूच्या बाटल्या. इतकी दुर्गंधीने की ओकारी व्हावी या पाहणीत तर आणखी एक आगळीकच हाती आले. स्वच्छतागृहे बांधली की म्हणे महापालिकेचे काम झाले... पुढे त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी तुमची नाही. पण महिलांच्या आरोग्यावर असे सरकारी उत्तर देणे बरे का, ते तुम्हीच सांगा. साहेब उपाय शोधला की गवसेलच!
अहो, भर रस्त्यात बिचाऱ्या आमच्या अनेक बायाबापड्या पोटापाण्यासाठी बसतात. काही जणी खरेदीला येतात, तर काही जणी नोकरीसाठी घराबाहेर पडतात. पण एकदा घर किंवा कार्यालय सोडले की यांच्या आरोग्याची व्यवस्था करणारी काही सोयच नाही.
दिवसदिवसभर त्या शरीराला गोठवून ठेवतात. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो... काही वेळा इन्फेक्शन्स होतात. काही जणी पाणीच पिण्याचे टाळतात. आता दिवसभर पाणीही प्यायचं नाही म्हटल्यावर त्यांच्या शरीराची काय अवस्था होत असेल? तुम्ही समजूतदार आहात. तुमच्या स्वच्छतागृहाच्या कामाचे कौतुकच आहे, पण म्हटले पुण्यातल्या प्रकल्पासाठी तुम्ही दिल्लीत जाऊन पंतप्रधानांकडून पाठ थोपटवून घेतली, तर आता पुण्यात राहून पुणेकर महिलांकडूनही पाठ थोपटवून घ्या. गेल्या अनेक वर्षांपासून महिला स्वच्छतागृहांसाठी होणाऱ्या झगड्याला यंदा तुम्ही तडीसच न्या आणि हो नुसते बांधकाम उभारून नव्हे, तर त्या स्वच्छतागृहांची स्वच्छताही राहील हे पाहा. ते काम पालिकेचे नाही म्हणून हात झटकू नका.
प्रशासन म्हणून तुम्ही पुढे तर या. काहीतरी उपाय शोधता येईलच. आणि आपल्याकडे जुनी म्हण आहेच, जिथे प्रश्न तिथे उत्तर. जिथे समस्या तिथे उपाय. तर मग सांगा आता महिला स्वच्छतागृहांची मोहीम कधी हातात घेताय अन् आमच्या पुणेकर महिलांची वाहवा कधी मिळवताय...