आयुक्तसाहेब, आता तुम्हीच लक्ष घाला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:14 AM2021-02-23T04:14:36+5:302021-02-23T04:14:36+5:30
धायरी : सिंहगड रस्त्यावरील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता महापालिकेकडून कोणत्याच प्रकारची दक्षता घेतली जात नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या ...
धायरी : सिंहगड रस्त्यावरील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता महापालिकेकडून कोणत्याच प्रकारची दक्षता घेतली जात नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात सर्वप्रथम सिंहगड रस्ता परिसरात पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. त्यानंतर पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. सध्या सर्वाधिक रुग्णसंख्या सिंहगड रस्ता परिसरात वाढत असून सिंहगड रस्ता ‘कोरोनाचा हॉटस्पॉट’ ठरत आहे. पुरेशा साधनसामग्रीचा अभाव, मनुष्यबळाची कमतरता यामुळे सिंहगड रस्ता परिसरातील कचरा नियमित उचलला जात नसल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याची तक्रार येथील नागरिक करीत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही महापालिका व लोकप्रतिनिधी याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी विशेष लक्ष घालून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सिंहगड रस्त्यावरील वाढते नागरीकरण, लोकसंख्यावाढीमुळे कचरानिर्मितीचे प्रमाण वाढले आहे, तुलनेत दररोज होणाऱ्या कचऱ्याचे ओला आणि सुका कचरा वर्गीकरण योग्य पद्धतीने होत नसल्याचे पाहावयास मिळत आहे. तुकाईनगर, विश्रांतीनगर, सिंहगड रस्ता परिसर आदी भागांत रस्त्यालगत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. पालिकेकडून वेळोवेळी कचरा उचलला जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा त्रास होत आहे. त्याची दखल घेऊन पालिकेने योग्य ती कार्यवाही करावी, यासाठी अनेकदा पाठपुरावा करून देखील दुर्लक्ष करण्याचे धोरण पालिका प्रशासन घेत आहे, अशी तक्रार या भागातील नागरिकांनी केली. या भागात कचऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचा आरोपही केला जात आहे.
हॉटेलच्या कचऱ्यामुळे दुर्गंधी, रोगराई पसरली
तुकाईनगर भागात रस्त्यालगत असणाऱ्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तर सिंहगड रस्ता परिसरातील हॉटेल्स, दुकाने, भाजी मंडईचे दुकानदार तसेच आजूबाजूचे सर्व लोक या ठिकाणी कचरा आणून टाकतात. त्यामुळे सोसायटी आणि परिसरात प्रचंड डासांचा उपद्रव झाला आहे तसेच हॉटेलच्या ओल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी, रोगराई पसरत आहे. तसेच परिसरात सोसायटीधारक राहत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई करावी. तसेच या परिसरात डासांचा उपद्रव कमी करण्यासाठी कीटकनाशक, धुराची फवारणी करण्यात यावी म्हणजे रोगराईला आळा बसेल, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
कोट
सिंहगड रस्ता परिसरातील कचरा नियमितपणे उचलला जात आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात स्वच्छता करण्यात येत आहे. काही नागरिक व हॉटेल व्यावसायिक रात्री-अपरात्री रस्त्यालगत कचरा टाकतात.
- केतन निकम, आरोग्य निरीक्षक, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय
फोटो ओळ : सिंहगड रस्ता परिसरात रस्त्यालगत कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.