पुणे शहर वाहतूक शाखेच्या कारवाईला पोलीस आयुक्तांचा 'जॅमर'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 12:55 PM2022-06-13T12:55:09+5:302022-06-13T12:57:38+5:30
खंडणीचा गुन्हा दाखल होण्याचीही शक्यता...
पुणे : वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराच्या तक्रारी वाढल्याने स्वत: पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी जॅमर लावला आहे. पुढील आदेश येईपर्यंत सर्व प्रकारच्या टोईंगची कारवाई व रस्त्यावरील पावत्या फाडणे थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाहतूक पोलीस फक्त वाहतुकीचे नियमन करण्याकडे लक्ष देतील, असे आदेश काढण्यात आले आहेत. त्याचबरोबर वाहतूक पोलिसांविषयी आलेल्या तक्रारींची चौकशी विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्तांकडे सोपविण्यात आली असून त्यात जे दोषी आढळून येतील, त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
पोलीस आयुक्तांनी दिलेला आदेश
* रस्त्यावरील कोणतेही वाहन पुढील आदेशापर्यंत टोईंग वाहनाद्वारे उचलले जाणार नाही.
* रस्त्यावर ज्या केसेस केल्या जातात. त्या पुढील आदेश येईपर्यंत कुठलीही पावती केली जाणार नाही.
* जर वाहतुकीला अडथळा येत असेल, वाहनचालकाने रस्त्यामध्येच गाडी लावली असेल तर त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते आपल्या परिमंडळाच्या पोलीस उपायुक्तांना पाठवून त्यांच्या परवानगीने असे वाहन टोईंग करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा.
* वाहतूक पोलिसांवर टीका होत असल्याने त्याची खात्री करण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांना पाठविण्यात येणार आहे. अशावेळी काही आक्षेपार्ह आढळल्यास त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.
* वाहतूक शाखेविषयी आलेल्या तक्रारींची चौकशी विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्या प्राथमिक चौकशीत जे आढळून येईल, त्यानुसार टोईंग चालक, मालक किंवा वाहतूक पोलीस यांच्यापैकी कोणावर खंडणीचा गुन्हा दाखल करायचा हे निश्चित करण्यात येणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वाहतूक शाखेच्या सर्व पोलीस निरीक्षक, सहायक आयुक्त आणि उपायुक्त यांची बैठक घेऊन संपूर्ण शाखेची झाडाझडती घेतली. नागरिकांच्या तक्रारी येता कामा नयेत. या तक्रारीत तथ्य आढळून आल्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी सर्वांना दिला.
रस्त्यावरील पोलीस गायब
वाहतूक शाखेच्या पोलिसांना कारवाई न करता फक्त वाहतूक नियमन करण्याचे आदेश दिल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून चौकाचौकांत घोळक्याने उभे असलेले वाहतूक पोलीस अचानक गायब झाल्यासारखे झाले आहेत. नेहमी चौकाच्या एका बाजूला दबा धरून बसून डाव्या बाजूने येणाऱ्या वाहनचालकांना पकडणारे पोलीस दिसत नव्हते. सातारा रोडवर दिवसभर वाहतूक असते; पण शनिवारी तसेच रविवारीही या रस्त्यावर अरणेश्वर चौक वगळता कात्रजपर्यंत सायंकाळच्या वेळी एकही वाहतूक पोलीस दिसला नाही. शहराच्या अनेक चौकात हीच परिस्थिती दिसून आली.