रस्त्यावरील तलावांची आयुक्तांकडून गंभीर दखल
By Admin | Published: June 14, 2017 04:05 AM2017-06-14T04:05:49+5:302017-06-14T04:05:49+5:30
सोमवारच्या पावसाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा उघड केला. त्याची आयुक्त कुणाल कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे. बुधवारी दिवसभर महापालिकेचे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सोमवारच्या पावसाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा उघड केला. त्याची आयुक्त कुणाल कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे. बुधवारी दिवसभर महापालिकेचे सर्व विभागप्रमुख प्रभागनिहाय पाहणी करणार असून, काम झालेले नसेल, अपुरे असेल तिथे संबंधित अधिकाऱ्यांवर लगचेच कारवाई करण्यात येईल. ही कारवाई करतानाच ते कामही पूर्ण करून घेतले जाईल.
आयुक्तांनीच ही माहिती दिली. सोमवारच्या पावसाने शहरात कुठेकुठे पाणी साचले, त्याची माहिती घेतली. दिवसभर तक्रारीही येत होत्या. त्यावरून माहिती मागवली असता नालेसफाईचे काम १०० टक्के झाले असल्याची कागदपत्रे अधिकाऱ्यांनी दाखवली. कागदोपत्री तरी काम पूर्ण झाले असल्याचे दिसते. तरीही पाणी साचत असेल तर त्याची कारणे शोधणे गरजेचे आहे. त्यामुळेच सर्व विभागप्रमुख बुधवारी दिवसभर शहराची प्रभागनिहाय माहिती घेतील, असे आयुक्तांनी सांगितले.
त्यासाठी सर्व विभागप्रमुखांचे नावासह वेळापत्रकच तयार करण्यात आले आहे. काही नागरिकांकडून पाणी साचलेल्या ठिकाणांची नावेही समजली आहे. एकूण किती ठिकाणी पाणी साचले, याची नेमकी माहिती उपलब्ध नाही; मात्र बुधवारच्या पाहणीनंतर ती मिळेल. त्यानंतर त्या-त्या विभागातील अधिकाऱ्यांची माहिती घेऊन त्यांना तिथे झालेल्या नालेसफाईच्या कामाबाबत विचारण्यात येईल. दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त म्हणाले.
आपत्ती व्यवस्थापनाचा अहवाल उद्या
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापना विभागाचा अहवाल पूर्ण झाला असून, येत्या १५ जून रोजी तो प्रकाशित करण्यात येईल. प्रभागनिहाय स्वतंत्र कक्षही सुरू करण्यात येणार असून, तिथे नागरिकांना वसाहतीत पाणी घुसले, नाले तुंबले वगैरेबाबत तक्रारी करता येतील. त्याची त्वरित दखलही घेतली जाईल, असे आयुक्त म्हणाले. महापालिका प्रशासनाचे शहरातील स्थितीवर लक्ष असून आपत्तिजनक ठिकाणी काळजी घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.