आयुक्त, महापौरांच्या परदेशवाऱ्यांवर उधळपट्टी
By admin | Published: October 1, 2015 12:52 AM2015-10-01T00:52:08+5:302015-10-01T00:52:08+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत एलबीटी बंद झाल्यानंतर उत्पन्नात घट झाली. तरीही महापौर, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या दौऱ्यांवर
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत एलबीटी बंद झाल्यानंतर उत्पन्नात घट झाली. तरीही महापौर, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या दौऱ्यांवर, तसेच नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांवर कोट्यवधींची उधळपट्टी केली जाणार आहे. ही उधळपट्टी थांबवावी, अशी मागणी सजग नागरिकांकडून होत आहे.
महापालिकेत पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या दौऱ्यांवर व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त होणाऱ्या क्रीडा स्पर्धांवर कोट्यवधीचा खर्च केला जाणार आहे. एलबीटी बंद झाल्याने महापालिकेचे उत्पन्न निम्याने घटले आहे. त्यातच स्मार्ट सिटीतूनही शहराला वगळल्याने महापालिकेचा आर्थिक गाडा चालविणे कठीण होणार आहे. मागील सर्वसाधारण सभेत उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात, अशा सूचना नगरसदस्यांनी केल्या होत्या. मात्र, उपाययोजना करण्यापेक्षा दौऱ्यांवरील
खर्चाचे विषय स्थायी समितीत एकामागून एक मंजूर केले जात आहे. मात्र, त्यावर विरोधक काहीही बोलत नाहीत, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
मागील सर्वसाधारण सभेत महापौर शकुंतला धराडे यांचा स्पेन दौरा आणि पर्यावरण विभागाच्या सदस्यांच्या दौऱ्यांवर पंधरा लाखांचा विषय मंजूर करण्यात आला. त्यानंतर काल झालेल्या सभेत आयुक्त राजीव जाधव यांच्या चीन आणि दक्षिण कोरियाच्या दौऱ्याच्या विषयास मान्यता दिली आहे. शहरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकास प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यासाठी केंद्र शासन आणि जागतिक बँकेकडून कोट्यवधी रुपयांचे अर्थसाहाय्य घेतले आहे.
दुष्काळी परिस्थिती आणि महापालिकेचे उत्पन्न कमी होत असताना अशा प्रकारे वाढदिवसानिमित्त होणाऱ्या स्पर्धांवर उधळपट्टी करणे योग्य आहे का? ही बाब लोकनेते असणाऱ्या पवार यांना रुचेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)