पिपंरी चिंचवड महापालिकेत आयुक्तांची सरप्राइज विजिट; टाइमपास करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 02:48 PM2017-10-05T14:48:49+5:302017-10-05T14:49:44+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण डार्डीकर यांनी गुरूवारी सकाळी महापालिकेमध्ये कार्यालयामध्ये सरप्राइज विजिट दिली.
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण डार्डीकर यांनी गुरूवारी सकाळी महापालिकेमध्ये कार्यालयामध्ये सरप्राइज विजिट दिली. यावेळी आयुक्तांनाही थक्क करणारा कारभार पाहायला मिळाला. ऑफिसमध्ये सकाळच्या शिफ्टला आलेले कर्मचारी अक्षरशः टाइमपास करताना पाहायला मिळाले. गुरूवारी सकाळी आयुक्तांची प्रवेशव्दारातून नेहमीप्रमाणे मुख्य प्रशासकीय इमारतीत जाण्याऐवजी सहज पाहणी करण्याच्या उद्देशाने त्यांनी इमारतीच्या पाठीमागील बाजुस फेरफटका मारला. सकाळी ड्युटीवर आल्यानंतर थम्ब पंचिंग करून निवांत गप्पा मारणाऱ्यांचं टोळकं जमलं होतं. महापालिका कार्यालयात अचानक आलेल्या आयुक्तांना पाहताच महापालिका कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.
महापालिकेत सकाळी ९ च्या सुमारास आयुक्त श्रावण हार्डीकर दाखल झाले. अनपेक्षितपणे त्यांनी इमारतीच्या मागील बाजुस पायी जाऊन पाहणी केली. कॅन्टीनजवळ कट्यावर कर्मचारी सकाळीच निवांतपणे गप्पा मारत बसल्याचे चित्र त्यांना प्रत्यक्ष पहावयास मिळालं. आयुक्त आल्यावर कामचुकार कर्मचाऱ्यांची अक्षरश: तारांबळ उडाली. आपापल्या जागेवर जाऊन बसण्यासाठी कर्मचारी पटकन निघून गेले.
महापालिकेत कामचूकार अधिकारी, कर्मचारी यांची संख्या मोठी आहे. सकाळी कार्यालयात यायचे, हजेरी लावायची,पुन्हा निघून जायचे. काही कर्मचारी तर सकाळी महापालिकेत थम्ब पंचिंग केल्यानंतर चक्क दुपारनंतर स्वत:चे दुकान अथवा टपरी चालविताना दिसून येतात. क्रीडा विभागात तर प्रचंड अनागोंदी कारभार आहे.
महापालिकेत अधिकारी, कर्मचारी यांना तत्कालिन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी शिस्त लावली होती. अधिकाऱ्यांना विशिष्ट गणवेश वापरणं बंधनकारक केलं होतं. त्यामुळे काहीतरी सबब सांगून तासन् तास कार्यालयाच्या बाहेर काढणाऱ्या अधिकाऱ्यांना शिस्त लागली होती. जेवणाच्या सुटीनंतर बाहेर गेल्यानंतर दोन तासाहून अधिक काळ कार्यालयाबाहेर स्वत:ची कामे करणाऱ्यांना चाप बसला होता. परदेशी यांची बदली होताच शिस्त उरली नाही. रंगीबेरंगी कपडे, टी शर्ट परिधान करून अधिकारी पुन्हा वावरू लागले. अधिकारी कोण? नागरिक कोण? हे समजणे कठीण झाले. परदेशी यांच्यानंतर राजीव जाधव यांच्या काळातही अधिकारी अधुनमधुन गणवेश वापरताना दिसून येत होते. आता त्यात बदल झाला आहे. बेशिस्त कारभार सुरू आहे. ही परिस्थिती अचानक पाहणी केलेल्या आयुक्त श्रावण हार्डीकर यांना पहावयास मिळाली.