नागर वस्तीतील समूह संघटिकांना मिळाला न्याय
By admin | Published: April 1, 2017 02:27 AM2017-04-01T02:27:44+5:302017-04-01T02:27:44+5:30
महापालिकेच्या नागर वस्ती विकास विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या समूह संघटिकांसाठी वयाची अट
पुणे : महापालिकेच्या नागर वस्ती विकास विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या समूह संघटिकांसाठी वयाची अट प्रशासाने मागे घेतली आहे. याबाबतचा आदेश जारी केला आहे.
गेली अनेक वर्षे नागर वस्ती विकास विभागात समूह संघटिकांच्या माध्यमातून शहरातील वसाहतींमध्ये विविध योजना राबविण्यात येतात. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत अशा अनेक समूह संघटिका आहेत. गेली अनेक वर्षे त्या हे काम करतात. सर्वांची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने होते. दर ६ महिन्यांनी त्यांचे काम काही दिवस थांबवण्यात येते व नंतर त्यांना पुन्हा नियुक्ती दिली जाते. गेली अनेक वर्षे ही पद्धत व्यवस्थित सुरू आहे. त्यात काहीही खंड पडला नव्हता. तरीही काही महिन्यांपूर्वी महापालिका प्रशासनाने या समूह संघटिकांच्या नियुक्तीसाठी वयाची अट जारी केली. राखीव जागेसाठी ४३ व खुल्या जागेसाठी ३८ अशी ही अट होती.
राज्य सरकारच्या नोकरभरतीसंबधी असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही अट लागू करीत असल्याचे यासंबंधीच्या आदेशात म्हटले होते. त्यामुळे गेली अनेक वर्षे समूह संघटिकेचे काम करीत असलेल्या महिलांवर बेरोजगार होण्याची वेळ आली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्याकडे त्यांनी आपली कैफियत मांडली. त्यांनी आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेतली. आयुक्तांनी वयाची अट शिथिल करण्याचे मान्य केले. (प्रतिनिधी)