पुणे शहराच्या विकासासाठी कटिबद्ध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 02:53 AM2018-03-30T02:53:24+5:302018-03-30T02:53:24+5:30
पुणे महापालिकेत प्रथमच भारतीय जनता पार्टी प्रचंड बहुमताने विजयी झाली अन् पक्षाने सत्ता स्थापन केली. या भारतीय जनता पक्षाच्या सत्तेतील पहिल्या महापौर होण्याची संधी मला मिळाली.
मुक्ता टिळक
पुणे महापालिकेत प्रथमच भारतीय जनता पार्टी प्रचंड बहुमताने विजयी झाली अन् पक्षाने सत्ता स्थापन केली. या भारतीय जनता पक्षाच्या सत्तेतील पहिल्या महापौर होण्याची संधी मला मिळाली. गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रिय असून, विविध पदांवर कामेदेखील केली आहेत. परंतु देशाची सांस्कृतिक राजधानी, आयटी सिटी असलेल्या पुणे शहराच्या प्रथम नागरिक हा माझ्यासाठी सर्वोच्च बहुमान आहे. या शहराचा नावलौकिक वाढविणे व विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
राजकीय वारसा असलेल्या घरातच सून म्हणून गेले आणि घराचा वारसा पुढे चालू
ठेवला. आरक्षणामुळे महिलांना राजकारणात
संधी मिळाली. तशीच मलादेखील सन २००२च्या महापालिका निवडणूक लढविण्याची संधी मिळाली. त्यापूर्वी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरूच होते. परंतु नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर राजकारणाच्या माध्यमातून समाजकराण करण्यावर अधिक भर दिला. टिळक घराला राजकीय वारसा असला
तरी मला मात्र सहजासहजी काही मिळाले
नाही. प्रत्येक वेळी सर्वसामान्य राजकारण्यांना
जे कष्ट, संघर्ष करावा लागतो तो मलादेखील करावा लागला. परंतु घरामध्ये निर्णयाचे पूर्णपणे स्वातंत्र्य होते. याचा नगरसेवक
आणि आता महापौर म्हणून काम करताना खूप फायदा होतोय.
गेल्या एक वर्षापासून पुण्याच्या महापौर म्हणून काम करतेय. या पदामुळे एका वर्षात
खूप काही शिकायला मिळाले. विरोधकांची मानसिकता, जनतेच्या अपेक्षा आणि विकासापेक्षा सामाजिक भावनेला दिलेले अधिक महत्त्व आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न, या सर्व गोष्टी सांभाळून आपले काम करणे खरी तर मोठी
कसरत असते. असे असताना माझा व
पक्षाचा नेहमीच सकारात्मक दृिष्टकोन ठेवला आहे. त्यामुळेच शहराच्या विकासासाठी महापालिका प्रशासनाला शिस्त लागावी, शहराच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निणर्य घेण्यावर अधिक भर दिला आहे. हे करताना अनेकदा सहकारी व नागरिकांची मानसिकता सांभाळण्याचे मोठे आव्हान असते. शहराच्या विकासासाठी अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. यामध्ये पुणे शहराची वाहतूककोंडीतून सुटका करणे हा आमचा महत्त्वाचा अजेंडा आहे. यासाठीच मेट्रो, बीआरटी, सायकलिंग यांसारख्या योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. नदी सुधार प्रकल्प असो की २४ बाय ७ पाणीपुरवठा करण्याचा विषय, भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहराचा विकास व सर्वसामान्य पुणेकरांना जास्तीतजास्त चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत व पुढेदेखील करत राहू.
आरक्षणामुळे महिलांना राजकारणात संधी मिळत आहेत. परंतु या क्षेत्रातील आव्हाने पेलण्यासाठी आवश्यक असलेल्या क्षमता स्वत:मध्ये निर्माण केल्या पाहिजेत. यासाठी फिल्डवर असताना, काम करताना प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना थोडी अभ्यासाची जोड दिली तर चांगल्या प्रकारे काम करू शकतो. आपल्या प्रभागातील, शहराचे सामाजिक प्रश्न काय आहेत या सर्व गोष्टीचादेखील अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे इतर कोणत्याही क्षेत्राप्रमाणे राजकारणातदेखील यशस्वी होण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही.
भारतीय जनता पक्षात काम करताना आतापर्यंत विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली. राजकारणात काम करताना मी पदापेक्षाही पक्षाला अधिक महत्त्व दिले आहे. त्यामुळे यापुढे देखील पक्ष देईल ते जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार.