‘बालगंधर्व’ पूनर्विकासासाठी समिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 03:12 AM2019-03-13T03:12:33+5:302019-03-13T03:14:30+5:30
प्रस्तावांचे सादरीकरण; कला क्षेत्रातील मान्यवरांची पुनर्विकास समितीमध्ये वर्णी
पुणे : बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासंदर्भात कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास समिती स्थापन केली जावी आणि त्यामध्ये कला क्षेत्रातील व्यक्तींचा प्रामुख्याने समावेश असावा या रंगधर्मींच्या मागणीला महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
पुनर्विकासासंबंधी निर्णय घेण्यासाठी वीस जणांची स्थापन करण्यात आली असून, त्यामध्ये सांस्कृतिक व कला विश्वातील तब्बल आठ मान्यवरांची वर्णी लावण्यात आली आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासंदर्भात आलेल्या प्रस्तावांची त्यांच्या उपस्थितीत पडताळणी होणार आहे. येत्या काही दिवसातच समितीच्या बैठकीमध्ये प्रस्तावांचे सादरीकरण करून अंतिम आराखडा निश्चित केला जाणार आहे.
पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात मानदंड प्रस्थापित केलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या वास्तूचा पुनर्विकास करण्याची घोषणा महापालिकेने करताच ही वास्तू पाडली जाणार? या चर्चेने सांस्कृतिक विश्वात खळबळ उडाली होती. मात्र महापालिकेने या वास्तूचा पुनर्विकास करण्यासाठी समिती स्थापन केली जाईल आणि त्यानंतरच पुर्नविकासाच्या दिशेने पावले उचलली जातील असे स्पष्ट केले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने समिती स्थापन केली असून, त्यात उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, स्थायी समिती अध्यक्ष, माजी स्थायी समिती अध्यक्ष, महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, वास्तुशिल्पकार (भवन), आर्किटेक्ट यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, प्रशांत दामले, कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन, नाट्यकर्मी श्रीरंग गोडबोले, बालगंधर्व परिवाराच्या अनुराधा राजहंस, दिग्दर्शक प्रविण तरडे, निवेदक सुधीर गाडगीळ, आशय फिल्म क्लबचे विरेंद्र चित्राव या आठ जणांचा समावेश करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज रंगमंदिर, मनोरंजनाच्या सुविधा, वाहनांसाठी मुबलक जागा अशा माध्यमातून बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा विचार करण्यात येणार आहे. त्याकरिता महापालिकेच्या अंदाजपत्रकात ११ कोटी ४० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासाठी वास्तूविशारदांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार 57 वास्तू विशारदांची नोंदणी महापालिकेच्या भवन रचना विभागाकडे झाली होती. त्यातील केवळ २६ वास्तू विशारदांकडून प्रस्ताव सादर झाले आहेत. त्या प्रस्तावांचे या समितीसमोर सादरीकरण होणार आहे.
वास्तू विशारदांकडून मागविले दोन स्वरूपाचे प्रस्ताव
बालगंधर्व रंगमंदिराची सध्याची इमारत पाडून त्या ठिकाणी नव्याने प्रचलित डी.सी रूलनुसार नाट्यगृहाचा समावेश असणारी नवीन इमारत उभारणे आणि सध्याची इमारत कायम ठेवून नाट्यगृहाच्या इमारतीमध्ये आवश्यक त्या सुधारणा करणे आणि उर्वरित क्षेत्रावर नव्याने सर्वार्थाने परिपूर्ण अशा पद्धतीचा रंगमंदिराचा प्रकल्प उभारण्यासाठी आराखडा करणे अशा दोन स्वरूपाचे प्रस्ताव मागविण्यात आले होते.
बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासंबंधी निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन केली आहे आणि त्यात बालगंधर्व परिवारातील व्यक्तीला स्थान देण्यात आले आहे याचा आनंद आहे. पुनर्विकासाला विरोध नाही पण कशा पद्धतीने पावले उचलली जाणार आहेत हे महत्वपूर्ण आहे
- अनुराधा राजहंस,
बालगंधर्वांची नातसून