समिती अध्यक्षांना काहीच काम नसते...!
By Admin | Published: May 26, 2017 06:19 AM2017-05-26T06:19:59+5:302017-05-26T06:19:59+5:30
महापालिकेच्या सभागृहात नव्याने निवडून आलेल्या अनेक नगरसेविका व विषय समितीच्या अध्यक्ष, पदाधिकारी यांना सर्वसामान्य नागरिकांसाठी काही तरी चांगले करण्याची धडपड आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेच्या सभागृहात नव्याने निवडून आलेल्या अनेक नगरसेविका व विषय समितीच्या अध्यक्ष, पदाधिकारी यांना सर्वसामान्य नागरिकांसाठी काही तरी चांगले करण्याची धडपड आहे. यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न देखील सुरू आहेत. परंतु प्रशासन या नवीन लोकप्रतिनिधींना कशाचा थांगपत्ता लागून द्यायला तयार नाही. महिला व बालकल्याण समितीच्या राणी भोसले यांनादेखील असाच अनुभव आला. विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने तर चक्क समिती अध्यक्षांना काहीच काम नसल्याचे सांगून टाकले.
पंधरा वर्षांनंतर सत्ताबदल होऊन भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला. यामध्ये १६२ सदस्यांपैकी तब्बल शंभरपेक्षा अधिक सदस्य हे नव्याने निवडून आले आहेत. यात अनेक महिला सदस्यांनी तर पहिल्यांदा महापालिकेची पायरी चढली आहे. त्यामुळे येथील कारभार समजून घेणे आणि त्यानंतर आपल्या प्रभागातील लोकांची कामे करणे खूपच कठीण जात आहे. यामध्ये पन्नास टक्के आरक्षणामुळे महिला सदस्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये अनेक महिला सदस्या उच्च शिक्षित आहेत. त्यामुळे आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी काही तरी चांगले करण्याची तळमळ त्यांच्यामध्ये आहे. परंतु कारभारात मुरलेले व मातब्बर अधिकारी पाहिजे तेवढे सहकार्य मात्र करण्यास तयार नाहीत.
महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर राणी भोसले यांनी समिती व अध्यक्षांना काय अधिकार असतात, कोणत्या विषयांमध्ये पुढाकार घेऊ शकतो, याबाबतची माहिती त्यांनी विभागाचे प्रमुख संजय रांजणे यांना विचारली. परंतु त्यांनी थेट तुम्ही काही काळजी करू नका, अध्यक्षांना काही काम नसते, असे बिनधोक सांगून टाकले. त्यानंतर देखील अनेक विषयांची माहिती मागितल्यास याच स्वरूपाची उत्तरे त्यांनी मिळू लागली. हे काम तुम्ही करू शकत नाही... हा अधिकार समितीला नाही... असे सतत ऐकावे लागले. अखेर भोसले यांनी समितीच्या अध्यक्षांना, समितीला काहीच काम नसल्याचे लेखी देण्याची मागणी केली. यामुळे काही प्रमाणात माहिती मिळण्यास सुरुवात झाली. याचप्रमाणे विधी समितीच्या बैठकांनादेखील अधिकारी दांडी मारत असल्याचे समोर आले. याबाबत सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी लक्ष घातल्यानंतर व आयुक्तांना लेखी पत्र दिल्यानंतर अधिकाऱ्यांना महिलांचा दणका जाणवला.
महापालिकेत नव्याने निवडून आलेल्या माझ्यासारख्या अनेक महिला सदस्यांमध्ये चांगले काम करण्यासाठी धडपड करतात. विषय माहिती करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडे जातात. परंतु ज्या प्रमाणात माहिती मिळणे अपेक्षित आहे, ती मिळत नाही. अधिकारी अनेक वेळा लोकप्रतिनिधींना गृहीत धरतात, हे चुकीचे आहे. सर्वसामान्य नागरिकांचे काम करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकत्रीत काम केले पाहिजे.
- अॅड. गायत्री खडके,
अध्यक्षा, विधी समिती
सर्वसामान्य नागरिकांची कामे करण्यासाठीच लोकांनी आम्हाला निवडून दिले. परंतु महापालिकेत आल्यावर समजले की आपली कितीही धडपड असली तरी अधिकारी जो पर्यंत मनावर घेत नाही तो पर्यंत आपण काहीच करू शकत नाही. महापालिकेचा कारभार समजण्यासाठी नवीन सदस्यांना प्रशिक्षण दिले जाते. परंतु अधिकाऱ्यांनी माहितीच दिली नाही किंवा काही सांगितलेच नाही तर कितीही प्रशिक्षण झाले तरी महापालिकेत काम करणे आवघड आहे.
- राणी भोसले, अध्यक्षा,
महिला व बालकल्याण समिती