Pune MIDC fire:आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन; कंपनीचा मालक पुण्यातून ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 09:29 PM2021-06-07T21:29:29+5:302021-06-07T21:30:32+5:30
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची घोषणा
मुळशी तालुक्यातील उरवडे येथील केमिकल कंपनीला लागलेली आगीची घटना दु:खद आहे. या घटनेत एकूण १८ जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशामक दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली आहे. सध्या कुलींगचे काम सुरू आहे. नेमकी आग कशामुळे लागली हे तपासण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समितीची नेमण्यात आली आहे. यात चीफ फायर ऑफीसर, एमआयडीसीचे अधिकारी, महाराष्ट्र पोलुशन कंट्रोल बोर्डाचे अधिकारी तसेच पोलिसांचा समावेश आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. घटनास्थळी पीएमआरडीएचे अधिकारी आणि पोलिस अधिकारीही उपस्थित होते. कंपनीत प्लॅस्टिकच्या रॅपरिंगचे काम सुरू असताना शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. तपासानंतरच नेमकी आग कशामुळे लागली हे स्पष्ट होणार आहे. यानंतर योग्य ती कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. दरम्यान, घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. कंपनीचे मालक निकुंज शहा यांना त्यांच्या पुण्यातील घरातून ताब्यात घेण्यात आहे आहे. कंपनीला अचानक आग लागल्याने स्थानिकांनी ती विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अग्निशामक दलाचे बंदही तेथे आले. मात्र, रस्ते लहान असल्याने गाड्यांना आता जाता आले नाही. यामुळे जेसीबीच्या साह्याने कंपनीची भिंग फोडून आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. रात्री उशीरा पर्यंत आग विझवण्याचे कार्य सुरू होते.