पुण्याच्या रुग्णालयातील किडनी रॅकेटच्या चौकशीसाठी समिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 05:43 AM2023-07-21T05:43:31+5:302023-07-21T05:44:45+5:30

अवयव प्रत्यारोपणातील तज्ज्ञांचाही समावेश

Committee to inquire into kidney racket in Pune | पुण्याच्या रुग्णालयातील किडनी रॅकेटच्या चौकशीसाठी समिती

पुण्याच्या रुग्णालयातील किडनी रॅकेटच्या चौकशीसाठी समिती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या वर्षी राज्यभर गाजलेल्या पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमधील अवैध किडनी रॅकेट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने चौकशी समिती नेमली आहे. या समितीच्या अधयक्षपदी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश चंद्रकांत भडंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अवयव प्रत्यारोपणातील तज्ज्ञांचाही असेल. तीन महिन्यांत या समितीने अहवाल सादर करणे अपेक्षित आहे.

चौकशी समिती सर्व आरोपांची सखोल चौकशी करून त्याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणार आहे. तसेच, चौकशीदरम्यान काही अनियमितता आढळून आल्यास त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजनांची शिफारसही समिती करणार आहे. संबधितांविरुद्ध कारवाई करण्याची शिफारसही समिती करेल तसेच भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून उपाययोजनाही समिती सुचवेल.

प्रकरण काय?

सारिका सुतार या महिलेला पैशांचे आमिष दाखवून २४ मार्च २०२२ रोजी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. त्यासाठी तिच्याकडून ज्याने किडनी घेतली त्या आरोपीने बनावट कागदपत्रे प्रत्यारोपण समितीकडे सादर करून परवानगी घेतली होती. सुतार यांना पैसे न मिळाल्याने फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अवैध किडनी प्रत्यारोपणाबाबत संबंधित रुबी हॉल क्लिनिकचा सहभाग आहे किंवा कसे याची चौकशी होईल.

समितीत कोण कोण?
पुण्याचे अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) अरविंद चावरिया, वैद्यकीय शिक्षण व संशोधन माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, बॉम्बे हॉस्पिटलमधील नेफ्रोलॉजिस्ट डॉ.श्रीरंग बच्चू, ग्लोबल हॉस्पिटलमधील नेफ्रोलॉजिस्ट डॉ.भरत शाह, नेफ्रोलॉजिस्ट डॉ.अरुण तिरलापूर, क्रिटिकेअर रुग्णालयातील प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ.वत्सला त्रिवेदी, मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा विभागाचे आरोग्य सेवा सहायक संचालक, आरोग्य सेवा आयुक्तालयातील विधी सल्लागार भाग्यश्री रंगारी तसेच या समितीचे सदस्य सचिव म्हणून आरोग्य सेवा संचालक यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Web Title: Committee to inquire into kidney racket in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.