सर्वसामान्यांचे प्रश्न हीच प्राथमिकता : शेखर गायकवाड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 03:41 PM2020-01-23T15:41:21+5:302020-01-23T15:58:48+5:30
पालिकेतील सत्ताधारी व राज्यातील सत्ताधारी वेगळ्या पक्षांचे असल्याने या दोघांमध्ये समन्वय साधून विकास प्रकल्प मार्गी लावण्याचे आव्हान
पुणे : विद्यार्थिदशेपासून पुण्यात राहिलेलो असून, प्रशासकीय अधिकारी म्हणूनही पुण्यात काम केले आहे. त्यामुळे पुण्याचे आणि पुणेकर नागरिकांचे प्रश्न मला माहीत आहेत. पुण्यातील सर्वांत मोठा प्रश्न हा वाहतुकीचा असून, सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला प्राधान्य देणार आहे. संस्थात्मक आणि रचनात्मक कामावर भर देणार असल्याचे पालिकेचे नवनियुक्त आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.
गायकवाड यांनी बुधवारी महापालिकेचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयासह महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा संदर्भ देत पुण्यातील माहिती असल्याचे सांगितले. यासोबतच हवेली प्रांताधिकारी म्हणून केलेल्या कामाचा अनुभव असल्याचे नमूद करतानाच त्यांनी पुण्यातील प्रश्नांची जाणीव असल्याचे स्पष्ट केले.
पुण्यामध्ये सर्वसामान्यांना भेडसावणारा सर्वांत मोठा प्रश्न वाहतुकीचा आहे. पुण्यामध्ये यायचे म्हटले की ‘वाहतूककोंडी’च्या भीतीने धडकी भरते. ही समस्या सोडविण्यावर भर देण्यात येणार आहे. शहर एकीकडे स्मार्ट होत असतानाच दुसरीकडे वाहतूककोंडीही वाढत आहे. विशेषत: आयटी क्षेत्रातील तरुणांचा आयुष्यातील फार मोठा काळ या कोंडीमध्येच जात आहे. प्रवासात फार वेळ जातो. कोंडी कमी झाली तर नागरिकांना स्वत:साठी वेळ देता येईल. पुण्यातील पाण्याच्या समस्येवर काम करणे आवश्यक आहे.
साधारणपणे दोन टप्प्यांमध्ये काम करण्याचा मनोदय आहे. पहिल्या टप्प्यात पुण्यातील संस्थांच्या समस्या समजावून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यात येतील. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षण संस्था आहेत. यासोबत अन्य संस्थाही मोठे काम करीत आहेत. त्यानंतर वैयक्तिक स्वरुपाच्या समस्या आणि अडचणी दूर करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे गायकवाड म्हणाले.
पालिकेच्या प्रकल्पांच्या कामांना गती देण्याकरिता प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला जाईल. चूक होत असतील तर त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न राहील. अर्थसंकल्पामध्ये दर वर्षी येणारी
तूट कमी करण्यासोबतच छोट्या-छोट्या गोष्टींमधून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणार असून हा अर्थसंकल्प व्यावहार्य कसा राहील याची दक्षता घेऊ.
.........
रखडलेले प्रकल्प : उत्पन्नवाढीचे आव्हान
नियमांवर बोट ठेवून काम करणारे व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांसाठी सदैव उपलब्ध राहणारे अधिकारी म्हणून लौकिक असलेल्या, महापालिकेच्या नवनियुक्त आयुक्त शेखर गायकवाड यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. पालिकेतील सत्ताधारी व राज्यातील सत्ताधारी वेगळ्या पक्षांचे असल्याने या दोघांमध्ये समन्वय साधून शहरातील विविध विकास प्रकल्प मार्गी लावण्याचे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे.
महापालिका आयुक्तांचे बजेट येत्या २७ जानेवारी रोजी सादर होणार असून, गायकवाड यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच ते छापण्यासही गेले आहे़ बुधवारी गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यावर, स्वागत समारंभात ‘सर्वसामान्य नागरिक’ हा माझा प्राधान्यक्रम राहिल, असे जाहीर केले आहे. त्यांच्यादृष्टीने शहरातील वाहतूकसमस्या सोडविणे हे महत्त्वाचे काम असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना जाहीर केले़ त्यामुळे पालिकेच्या वतीने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी राबविण्यात येणाºया बीआरटी, मेट्रो, जायका प्रकल्प, तसेच वादात सापडलेला ‘एचसीएमटीआर’ प्रकल्प कशारितीने पुढे नेता येईल यासाठी त्यांचे प्रयत्न लक्षवेधी ठरणार आहेत.
महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी ‘एचसीएमटीआर’ प्रकल्पातील मार्गिका २४ मीटर रुंदीचे करण्याचे नियोजन केले आहे, तर आता राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी हा मार्ग ८ मीटरचाच असावा, अशा सूचना केल्या आहेत. परिणामी, या दोघांची सांगड घालण्याचे काम गायकवाड यांना करावे लागणार आहे.
शहरात चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असेलला २४ बाय ७ प्रकल्पाचे संथगतीने सुरू असलेले काम मार्गी लावणे, पालिकेतील सर्व विभागप्रमुखांची मोट बांधण्याबरोबरच, पालिकेचे उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी त्यांचे प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. आपल्या ३० वर्षांच्या सेवेत गायकवाड यांनी महसूल खात्यातही काम केले आहे, या काळात त्यांनी छोट्या-छोट्या गोष्टीतही उत्पन्नाचे स्रोत कसे वाढविता येतील हे पाहिले आहे. त्यामुळे गायकवाड यांची कार्यपध्दती पालिकेच्या दृष्टीने आशादायक आहे.