Pune: कात्रज पोलीस चौकीत पोलिसांना धक्काबुक्की करत तृतीयपंथीयांचा गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 11:35 AM2023-11-01T11:35:25+5:302023-11-01T11:35:50+5:30
पोलीस शिपाई केतन लोखंडे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे...
धनकवडी (पुणे):कात्रज पोलीस चौकीत गोंधळ घालून पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी तृतीयपंथीयांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी रोहित पवार (वय २६), सूरज कांबळे (वय १९), अजय अहिवळे (वय २४), राणी पाटील (वय २६), मयूर राऊत (वय २४, सर्व रा. खोपडेनगर), अल्फीया उर्फ लंगडी, खुशबू, आकाश यांच्या सह दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई केतन लोखंडे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कात्रज चौकात तृतीयपंथीय वाहनचालकांकडून थांबवून त्यांच्याकडून पैसे गोळा करतात. त्यांना सनी नावाचा एक जण त्रास देत होता. सनी दारु पिऊन त्यांना मारहाण करत असल्याने तृतीयपंथीयांनी तक्रार दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कात्रज पोलीस चौकीत नेले. पोलीस चौकीत तृतीयपंथीय जमले. त्यांनी सनीला ताब्यात द्या, अशी मागणी केली. त्याचा आम्ही खून करणार आहोत, असे सांगून पोलीस चौकीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तृतीयपंथीयांनी टेबलवरील कागदपत्रे फेकून दिली. पोलिसांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तृतीयपंथीयांनी पोलीस चौकीत गोंधळ घालून पोलीस शिपाई लाेखंडे यांना धक्काबुक्की केली.
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक वर्षा तावडे तपास करत आहेत.