मादीच्या शोधात संचार करणारा बिबट्या अखेर जेरबंद; तळेगाव ढमढेरेत घातला होता धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 06:05 PM2023-05-21T18:05:33+5:302023-05-21T18:05:55+5:30
बिबट्याने धावत्या दुचाकीवरील लोकांवर हल्ला करण्याबरोबरच अनेकांच्या शेळ्या, मेंढ्या, वासरे फस्त केली
तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे परिसरात अनेक दिवसांपासून लोकवस्तीत दहशत माजवणाऱ्या बिबट्यास अखेर पकडण्यास यश आले आहे. पिंजऱ्याची जागा बदलताच बारा तासाच्या आत बिबट्या जेरबंद झाला आहे. अनेक दिवसांपासून हा बिबट्या तळेगाव ढमढेरे टाकळी भिमा रस्त्या नजीकच्या ढमढेरे वस्ती परिसरात वास्तव्यास होता. त्यामुळे नागरिकही दहशतीखाली होते. मात्र आता त्याला पकडण्यात यश आले आहे. आज पहाटे बिबट्या या पिंजऱ्यात अडकला आहे. बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली होती.
तळेगाव ढमढेरे परिसरातील चौधरी वस्ती, ढमढेरे वस्ती, भिमाशेत, मोहन मळा, साळूमाळी वस्ती परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार संचार नागरिकांना पाहायला मिळत होता. बिबट्याने धावत्या दुचाकीवरील लोकांवर हल्ला, अनेकांच्या शेळ्या मेंढ्या वासरे फस्त केलेली होती. तर त्या परिसरात कुत्री गायब झालेली होती. तळेगाव ढमढेरे परिसरातील ढमढेरे वस्तीनजीक वनविभागाने बिबट्या जेरबंद करण्यासाठी २९ एप्रिल रोजी पिंजरा लावला होता. मात्र वीस दिवस उलटूनही बिबट्या पिंजऱ्यात येत नव्हता. त्यामुळे नागरिकांच्या आग्रहास्तव वस्तीपासून थोडा दूर पिंजरा दुसऱ्या जागी (दि.२० मे) लावल्यानंतर त्या पहिल्याच रात्री बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. यामुळे परिसरातील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला. बिबट्याची मादी आणि पिल्ले याच परिसरात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिरूरचे वनधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रमोद पाटील,वनरेस्क्यू टीम सदस्य गणेश टिळेकर,वनकर्मचारी बाबासो घोलप यांनी कार्यवाही केली तर अमोल ढमढेरे,संतोष ढमढेरे,वैभव ढमढेरे,रामभाऊ ढमढेरे,भाऊ सोनवणे,सार्थक ढमढेरे,सार्थक ढमढेरे,योगेश सोनवणे आदी युवकांनी पिंजरा लावण्यापासून ते स्थलांतर करेपर्यंत अथक प्रयत्न केले.
याबाबत माहिती देताना वनरक्षक प्रमोद पाटील म्हणाले की, धानोरे,विठ्ठलवाडी, तळेगाव ढमढेरे या गावातील वाड्या वस्त्यांवर हाच नर जातीचा बिबट्या आठ ते दहा किलोमीटर पर्यंत भक्ष मिळवण्याच्या शोधत फिरत होता. नर जातीचा बिबट्या असून साधारण बारा ते चौदा वयोगटातील आहे. मादी व पिल्ले याच परिसरात असल्याने त्याचा संचार होत होता असे पाटील यांनी सांगितले.