इथेनॉल उचलण्यास कंपन्या उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 02:45 PM2018-03-27T14:45:47+5:302018-03-27T14:45:47+5:30
इथेनॉल निर्मितीला चांगला वाव असतानाही आॅईल कंपन्यांकडून त्याकडे तितकेसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे साखर क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.
पुणे : आॅईल कंपन्यांकडून इथेनॉलचा पुरवठा करण्याबाबत कोट्यवधीचा कोटा राज्याला मंजूर झाला आहे. मात्र, आॅईल कंपन्यांकडून इथेनॉलची उचलच होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्याला ४३.७ कोटी लिटरची पर्चेस आॅर्डर मिळालेली असताना अवघ्या साडेपाच कोटी लिटर इथेनॉलची उचल कंपन्यांकडून करण्यात आली आहे.
देशपातळीवर यंदा उसाचे भरघोस उत्पादन झाले आहे. त्यामुळे इथेनॉलचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी चांगली स्थिती आहे. राज्यात २२ मार्चअखेरीस ८७५.९२ लाख टन ऊसगाळपातून ९७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. आॅईल कंपन्यांनी ३१३.५७ कोटी लिटरच्या खरेदीची निविदा प्रसिद्ध केली. त्यानंतर निवादा अंतिम होण्यात आणि इथेनॉल उत्पादकांना खरेदी मागणी आणि पुरवठ्यासंबंधीचे राज्य उत्पादनशुल्कची परवानगी घेण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागला.
परिणामी, राज्यातील उत्पादकांना ४३.३७ कोटी लिटर इथेनॉलपुरवठा करण्याची पर्चेस आॅर्डर मिळाली. गेल्या ३ महिन्यांत आॅईल कंपन्यांनी ११ कोटी लिटर इथेनॉलची उचल करणे आवश्यक होते; पण २६ फेब्रुवारी २०१८ अखेरपर्यंत केवळ ५.४६ कोटी लिटरचीच उचल केली. आॅईल कंपन्यांच्या सर्व डेपोंवर इथेनॉलचे टँकर रिकामे होण्यास तब्बल ७ ते ८ दिवसांचा कालावधी लागत आहे.
आॅईल कंपन्यांकडून इथेनॉल खरेदीबाबत उदासीनता असल्याचे दिसून येते. साखर हंगाम ऐन भरात असताना इथेनॉलची उचल होणे आवश्यक असते. याच काळात इथेनॉल उचलण्यास विलंब केला जात असल्याचे राज्य सहकारी साखर संघातील सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षी २०१६-१७ या हंगामात राज्यात अवघे ३७३.१३ लाख टन उसाचे गाळप झाले होते. त्यामुळे मळीच्या उत्पादनात घट झाली होती. तसेच, त्या वेळी आॅईल कंपन्यांनीदेखील इथेनॉलचा दर ३९ रुपये प्रतिलिटर जाहीर केला होता. त्यामुळे गेल्या हंगामात अवघ्या ८.३४ कोटी लिटरच्या निविदा अंतिम झाल्या होत्या. परिणामी, गेल्या हंगामात २०१५-१६च्या तुलनेत अवघा २० टक्के कोटाच भरला गेला होता. यंदा इथेनॉलचा दर ४०.८५ रुपये प्रतिलिटर इतका असून, इथेनॉलवरील स्थानिक संस्था कर व अबकारी कर रद्द झालेला आहे. तसेच, या हंगामात सुमारे साडेनऊशे लाख टनांवर ऊसगाळपाचा अंदाज आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मितीला चांगला वाव असतानाही आॅईल कंपन्यांकडून त्याकडे तितकेसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे साखर क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.