कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच केली दोन लाख २७ हजारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 02:13 PM2018-05-16T14:13:15+5:302018-05-16T14:14:32+5:30
कर्मचाऱ्यांनी एटीएम सेंटरमधून ४६ लाख ४४ हजार ५५० रुपये काढले. त्यापैकी ४४ लाख १७ हजार ५५० रुपये कंपनीच्या कार्यालयात जमा करून उरलेल्या दोन लाख सत्तावीस हजार रकमेची अफरातफर केली.
चाकण : एटीएम सेंटरमध्ये रक्कम भरणे व खातेदारांचे पैसे काढून जमा करणाऱ्या विश्रांतवाडी येथील रायटर सेफगार्ड प्रा. लि. या कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी दोन लाख सत्तावीस हजार रुपयांची अफरातफर केली. याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार अनिल ढेकणे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १८ एप्रिल २०१८ रोजी रात्री ११.५८ वाजता अॅक्सिस बँकेच्या चाकण येथील एटीएम सेंटरवर घडली. याबाबतची फिर्याद अश्वाक इकबाल सय्यद ( वय ४२, रा. फ्लॅट नं. ८, युनिक कॉर्नर, भैरवनगर, सर्व्हे नं. ५१, प्लॉट नं. ७३,धानोरी रोड, पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी कंपनीचा एटीएम आॅपरेटर सचिन आप्पाराव पायके व रवींद्र काशिनाथ काकडे (दोघेही रा. पुणे ) या दोघांवर चाकण पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांनी रक्कम जमा असलेल्या एटीएम सेंटरमधून ४६ लाख ४४ हजार ५५० रुपये काढले. त्यापैकी ४४ लाख १७ हजार ५५० रुपये कंपनीच्या कार्यालयात जमा करून उरलेल्या दोन लाख सत्तावीस हजार रकमेची अफरातफर केली. कंपनीच्या इंजिनिअर्सने सदर एटीएमची तपासणी केली असता ही घटना उघडकीस आली. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रशांत पवार पुढील तपास करीत आहेत.
=======================