Pune MIDC fire कंपनी मालक शहा यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 07:46 PM2021-06-08T19:46:28+5:302021-06-08T19:47:29+5:30
कंपनी मालक शहा यांना अटक पोलिसांनी केली कसून चौकशी :परवानगी नसतांना सॅनिटायझरचे पॅकिंग
पिरंगुट : एसव्हीए ॲक्वा कंपनीला केवळ क्लोरोक्विनचा गोळ्यांच्या पँकींगची आणि पावडर तयार करण्याची परवानगी होती. फक्त याचाच परवाना असतांना सॅनिटायझर प्लॅस्टिक बॉटलमध्ये भरण्याचे काम मालकाने या ठिकाणी सुरू केले होते. हे अतिशय धोकादायक रसायन असल्यामुळेच या ठिकाणी ही मोठी घटना घडली आणि त्यात १७जणांना त्यांचा जिव गमवावा लागला. याप्रकरणी कंपनी मालक निकुंज शहा याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मृतांच्या कुटुंबीयांनी केली. दरम्यान, निकुंज शहा याची पौड पोलिस चौकशी करत असून त्याच्यावर सायंकाळी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील यांनी लोकमतला दिली.
एसव्हीएस अॅक्वा कंपनीत केवळ पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरोक्वीनच्या गोळ्या बनवण्याची परवानगी होती. मात्र, या परवान्याचा गैरवापर करत तसेच परवानगी नसतांना शहा याने सॅनिटायझर पॅकिंगचे काम या ठिकाणी सुरू केले होते. तसेच कंपनीत सुरक्षेच्या दृष्टीने कुठलेही व्यवस्था केली नव्हती. कारखान्यातून बाहेर पडण्यासाठी केवळ एकच दरवाजा होता. तसेच व्हेटीलेशनचाही अभाव कंपनीत होता. या कंपनीचे स्वरूप हे गोडाऊनचे होते. असे असतांनाही येथे कंपनी चालवली जात होती. धोकादायक सॅनिटायझर तसेच ज्वलनशील पदार्थाचा मोठ्या प्रमाणात साठा केल्याने आगीने उग्र रूप धारण केल्याचे प्राथमिक अहवालात मिळालेल्या माहितीत पुढे आले आहे असे ही भोरे पाटील म्हणाल्या. यामुळे निकुंज शहा यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामगार राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी कामगारांचे नातेवाईक तसेच स्थानिकांनी कंपनीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेत स्थानिक प्रशासन व पोलिस यांनी दिवसभर कंपनीमालक शहा यांची कसून चाैकशी केली. यानंतर संध्याकाळी उशीरा पाैड पोलिसांनी शहा यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. शहा यांची चोकशी शुरू असतांना त्यांचे नातेवाईल पिरंगुट पोलिस चौकीत उपस्थित होते.
चौकट
परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांनाही सहआरोपी करा
या कंपनीत एकच दरवाजा होता. कंपनीचे बांधकाम हे गोदामासारखे होते. एकच दरवाजा असल्याने कामगारांना बाहेर पडता आले नाही. कंपनीत कुठलीही फायर सिस्टीम नसतांना या ठिकाणी सॅनिटायझर बनविण्याची परवानगी दिलीच कशी. कारखान्याची पाहणी करून ज्या अधिकाऱ्यांनी येथे उद्योग उभारण्यास, ज्वलनशील पदार्थ ठेवण्यास परवानगी दिली त्या अधिकाऱ्यांनाही कंपनीच्या मालकासह या प्रकरणी सहआरोपी घोषित करून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा.
-राम गायकवाड, शिवसेना भारतीय कामगार सेना
चौकट
तर आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही.
कंपनीच्या मालकाच्या चुकीच्या धोरणामुळे आज १८ कामगारांचे कुटुंब हे उघड्यावर आले आहेत. यातील अनेकजण घरातील एकुलते एक कमावणारे होते. त्यांना छोटी मुले आहेत. त्यांच्या भविष्याचे आता काय होणार ही माेठी चिंता आहे. सरकारने मोबदला दिला. पण कंपनी मालकाचे काय ? या कामगारांची जबाबदारी ही कंपनी मालकाची आहे. या कुटुंबातील अनाथ झालेल्या मुलांची जबाबदारी त्यांच्या शिक्षणाचा खर्च कंपनी मालकाने आजीवन उचलावा. तसे लेखी लिहून द्यावे. असे न केल्यास आम्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका मृतांच्या नातेवाईकांनी घेतली असल्याची माहिती मृत मंगल मरगळे यांचे नातेवाईक भाऊ आरडगे यांनी दिली.