HSC Exam Result: गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत निकालाची टक्केवारी घसरली; नेमकं कारण काय?
By प्रशांत बिडवे | Published: May 25, 2023 12:54 PM2023-05-25T12:54:58+5:302023-05-25T12:55:39+5:30
मागील वर्षी निकाल ९४.२२ टक्के तर यंदा ९१.२५ टक्के लागला
पुणे : यंदा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला असला तरी टक्केवारीचा टक्का मात्र घसरल्याचे दिसून येत आहे. २०२१ आणि २०२२ च्या निकालापेक्षा यंदा कमी निकाल लागला. २०२२ मध्ये ९४.२२ टक्के निकाल होता. त्यामुळे यंदा तो २.९७ टक्के घसरला आहे. दरम्यान, २०२० च्या तुलनेत मात्र ०.५९ टक्क्यांनी वाढला असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये निकालाची टक्केवारी वाढल्याचे बोलले जात होते. पण गेल्या वर्षी कोरोनाचा इफेक्ट नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित कॉलेज करता आले. २०२० मध्ये बारावीचा निकाल ९०.६६ होता, तर २०२१ (९९.६३) आणि २०२२ मध्ये ९४.२२ टक्के लागला. त्यामुळे यंदा निकालाचा टक्का चांगलाच घसरला आहे.
गेल्या चार वर्षांमधील एकूण निकाल पाहता २०२१ मध्ये सर्वाधिक ९९.६३ टक्के निकाल लागला. त्यात कला, विज्ञान, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम या शाखांचा निकालाही २०२१ मध्ये ९९ टक्क्यांच्या वरच होता. पण यंदा केवळ विज्ञान शाखेचा निकाल ९६ टक्के तर इतर शाखांचा निकाल कमी लागला आहे. त्यात कला शाखा ८४.०५, वाणिज्य ९०.४२, व्यवसाय अभ्यासक्रम ८९.२५ टक्के आहे.