जिल्ह्यात पीकविम्यातून २४७२ शेतकऱ्यांना भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:11 AM2021-05-21T04:11:19+5:302021-05-21T04:11:19+5:30

पुणे : पुणे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पीकविमा लागवडीखाली २ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा इतर ...

Compensation to 2472 farmers from crop insurance in the district | जिल्ह्यात पीकविम्यातून २४७२ शेतकऱ्यांना भरपाई

जिल्ह्यात पीकविम्यातून २४७२ शेतकऱ्यांना भरपाई

Next

पुणे : पुणे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पीकविमा लागवडीखाली २ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा इतर स्थानिक आपत्तीत पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येते. मात्र, विमा कंपनीचे अधिकारी नुकसानीचे शासन निर्देशानुसार पाहणी न करता एकाच गावात नुकसान झालेल्या अर्ध्या शेतकऱ्यांना भरपाई देतात, तर उर्वरित शेतकरी आमच्या निकषात बसत नसल्याचे सांगतात. त्यासाठी मंडलनिहाय आम्ही नुकसानभरपाई देतो असे सांगतात. परिणामी, संपूर्ण गावात गारपीट झाली असेल, तरी अर्ध्या गावाला भरपाई तर उर्वरित गाव आमच्या मंडलात येत नसल्याचे अजब कारण देतात. त्यामुळे अर्ध्या गावातील शेतकरी वंचित राहत आहेत.

पुणे जिल्ह्यात २८ हजार ४६७ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला आहे. त्यापैकी फक्त २४७१ शेतकऱ्यांना भरपाई मिळाली आहे. याबाबत कृषी विभागाचे अधिकारी सांगतात की, उरलेले २५ हजार ९९५ शेतकऱ्यांना आम्ही नुकसानभरपाई नाकारलेली नाही. तर आम्ही टप्प्याटप्प्याने नुकसानीची शहानिशा करून प्रत्येक शेतकऱ्यांना भरपाई देणार आहोत. मात्र, पीकविमा नुकसानभरपाईचे निकष जाचक असल्याने आम्हाला शासनस्तरावरून त्याबाबत काहीच कल्पना अथवा माहिती दिली जात नाही. त्यामुळे पीकविम्याचे पैसे भरूनही नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

-------------------------

* एकूण पीक विमा मंजूर :- १ कोटी ५ हजार रुपये

* प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी भरलेले पैसे -: ९८ लाख ९२ हजार रुपये

* जिल्ह्यातील विमा काढलेले एकूण शेतकरी :- २८ हजार ४६७

* एकूण लाभार्थी शेतकरी :- ८ लाख ३६ हजार

* एकूण किती जणांना मिळाला विमा :- २४७२

* आतापर्यंत जिल्ह्यात शेतकऱ्यांना वाटप केलेली एकूण रक्कम :- १ कोटी ५ लाख रुपये

----

मावळ तालुक्याला सर्वाधिक लाभ

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्याला सर्वाधिक लाभ मिळाला आहे. ७ हजार ७३३ शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता. त्यापैकी ११२४ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

----

पॉईंटर्स

* खरीप हंगाम २०२०-२१

* पीकविमा लागवड क्षेत्र :- २ लाख १४ हजार हेक्टर

* एकूण जमा रक्कम :- १ कोटी ५ लाख रुपये

----

कोट

१) पिकांचा खर्च वाढला आहे. दर वर्षी नैसर्गिक आपत्ती ही येतेच. वादळ, गारपीटीमुळे आमच्या आणि गावातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, विमा कंपन्यांचे अधिकारी फॉर्ममधील किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या त्रुटी काढून नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करतात.

- राजेंद्र गावडे, शेतकरी

--

२) शेतकऱ्यांसाठी पीकविमा योजना हक्काची आहे. मात्र, भाजीपाला, ऊस किंवा मूग तसेच इतर कडधान्याचे जेव्हा नैसर्गिक आपत्तीत नुकसान होते. तेव्हा विमा कंपनीचे अधिकारी जाणीवपूर्वक या पिकांना मिळेल, पण त्या पिकांना नुकसानभरपाई मिळणार नाही, असे सांगून टोलवाटोलवी करतात. त्यामुळे पीकविमा काढूनही भरपाई मात्र मिळत नाही. त्यामुळे सर्वच पिकांना ती लागू करावी.

- सखाराम खामकर, शेतकरी

---

३) नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यांना भरपाई द्यावी. त्या गावात जर ८ वाड्या असतील तर त्यातील फक्त ४ वाड्यांना मदत देतात. उर्वरित ४ वाड्या आमच्या परिमंडळ कार्यक्षेत्रात येत नाही, असे सांगतात. त्यामुळे विमा काढूनही त्याचा लाभ आम्हाला मिळत नाही.

- सुनंदा संजय थोरात, शेतकरी

------

पंतप्रधान विमा योजनेत पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय सहभागी शेतकरी

(तालुका) (सहभागी शेतकरी) (नुकसानभरपाई मिळालेले शेतकरी)

१) भोर १२०८ ०८

२) वेल्हा ५८१ ०९

३) मुळशी १२२१ ००

४) मावळ ७७७३ ११२३

५) हवेली ७६ ०१

६) खेड २२५४ ००

७) आंबेगाव ३३२६ २८९

८) जुन्नर ११८९ ००

९) शिरूर ५४६१ ००

१०) पुरंदर १२०८ २८६

११) दौंड २७७ १५६

१२) बारामती ४५८ १७८

१३) इंदापूर २७५१ ४२२

एकूण २८४६७ २४७२

Web Title: Compensation to 2472 farmers from crop insurance in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.