इंदापूर अर्बन बँकेकडून त्रुटींची पूर्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:08 AM2021-06-27T04:08:42+5:302021-06-27T04:08:42+5:30
इंदापूर : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर केलेली दंडात्मक कारवाई ही रिझर्व्ह बँकेच्या दैनंदिन कामकाजाचा भाग आहे. ...
इंदापूर : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर केलेली दंडात्मक कारवाई ही रिझर्व्ह बँकेच्या दैनंदिन कामकाजाचा भाग आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने एप्रिल २०२१ पासून अशा प्रकारची एकूण २९ बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. इंदापूर अर्बन बँकेने करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाई संदर्भातील त्रुटींची तात्काळ दुरुस्ती करून पूर्तताही केली आहे, अशी माहिती इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. एस. तावरे यांनी शनिवारी ( दि. २६ ) दिली.
राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली इंदापूर अर्बन बँकेचे कामकाज उत्तमरित्या सुरू आहे. बँकेची प्रगतीकडे वाटचाल चालू आहे. बँकेस सन २०२० -२१ या आर्थिक वर्षात करपूर्व नफा रुपये ६.५१ कोटी झाला असून निव्वळ नफा रुपये ३ कोटी रुपये झालेला आहे.
रिझर्व्ह बँकेकडून इंदापूर बँकेच्या ( दि. ३१ मार्च २०१९ ) अखेरच्या तपासणीत बँकेमधील सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे खातेदारांच्या के.वाय.सी. संदर्भात मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झालेचे आढळून आले. तसेच दैनंदिन प्रशासकीय कामामध्ये काही त्रुटी दिसून आल्या होत्या. त्यामुळे बँकेला दहा लाख रुपयांचा दंड करण्यात आला होता. त्यामुळे बँकेकडून सॉफ्टवेअर प्रणाली बदलाची प्रक्रिया व के.वाय.सी. संदर्भात पूर्तता करून त्रुटी पूर्णपणे दूर केल्या आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन हे इंदापूर अर्बन बँकेकडून केले जात आहे. तसेच सन २०२० -२१ या वर्षात सभासदांना लाभांश देण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात आला असून परवानगी मिळताच लाभांश वाटप करण्याचे बँकेचे धोरण आहे.
यावेळी बँकेचे संचालक रामकृष्ण मोरे, अमरसिंह पाटील, विलासराव माने, अशोक शिंदे, संदीप गुळवे, अँड. विकास देवकर, दादाराम होळ, आदिकुमार गांधी, सत्यशील पाटील, लालासो सपकळ, भागवत पिसे, अविनाश कोतमिरे, उज्वला गायकवाड, डॉ. अश्विनी ठोंबरे, उल्हास जाचक, ॲड. विजय पांढरे आदी उपस्थित होते.