‘राजगुरुनगर’ अत्याचार प्रकरणात कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाखांची नुकसान भरपाई
By नम्रता फडणीस | Updated: January 7, 2025 18:11 IST2025-01-07T18:11:46+5:302025-01-07T18:11:54+5:30
पीडित व त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाणार

‘राजगुरुनगर’ अत्याचार प्रकरणात कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाखांची नुकसान भरपाई
पुणे : राजगुरूनगर येथे खाऊ देण्याच्या आमिषाने अत्याचाराला बळी पडलेल्या दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांना मनोधैर्य योजनेंतर्गत प्रत्येकी दहा लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. सोनल पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.
लैंगिक अत्याचार, बलात्कार व ॲसिड हल्ल्यातील पीडितांना मनोधैर्य योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत राज्य सरकारने वाढ केली आहे. त्यानुसार, आता पीडित व त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाणार आहे. याबाबत महिला व बालविकास विभागाने गुरुवारी सुधारित शासन निर्णय काढला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुणे जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाने पुढाकार घेत राजगुरूनगर येथील बलात्कार व हत्येच्या गुन्ह्यात बळी पडलेल्या मुलींच्या कुटुंबांना प्रत्येक दहा लाख रुपयांची नुकसानभरपाई घोषित केली.
बलात्कार, लैंगिक अत्याचार, ॲसिड हल्ल्यातील पीडित मुला-मुलींसाठी मनोधैर्य योजनेतून मदत दिली जाते. लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलम २ (आ) अंतर्गत मनोधैर्य योजनेतून पीडित बालकाचे पुनर्वसन केले जाते. त्याचा मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबाला सावरण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली या योजनेच्या अंमलबजावणी समितीने राजगुरूनगर येथे अत्याचाराला बळी पडलेल्या दोन्ही मुलींच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत आर्थिक मदतीची व्याप्ती वाढल्यानंतर पुणे जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाने पाठपुरावा करून पीडित कुटुंबांना तत्काळ आर्थिक मदत मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.