अपघाती मृत्यू झालेल्या इंजिनिअरच्या कुटुंबियांना ५१ लाखांची नुकसान भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 02:13 PM2018-04-23T14:13:25+5:302018-04-23T14:13:25+5:30
वेलमेड कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअर असलेले मयत सुनील पद्माकर घाडगे दैनंदिन कामकाज संपवून दुचाकीवरून मोशी येथे घरी चालले होते. त्यावेळी डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली.
पुणे : अपघाती मृत्यू झालेल्या मेकॅनिकल इंजिनिअरच्या कुटुंबियांना ५१ लाख रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे. रविवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये सत्र न्यायाधीश जे.डी.वडणे, अॅड. शशिकांत बागमार आणि अॅड. संतोष काशिद यांच्या पॅनेलने नुकसान भरपाईसाठीबाबतचा हा दावा निकाली काढला.
सुनील पद्माकर घाडगे (वय २७) असे अपघातात मृत्यू झालेल्या इंजिनिअरचे नाव आहे. ते वेलमेड कंपनीत कामाला होते. २४ एप्रिल २०१६ रोजी दैनंदिन काम संपवून ते दुचाकीवरून घरी म्हणजे मोशी येथे चालले होते. त्यावेळी डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्या अपघातात घाडगे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी व आई-वडिलांनी डंपर मालक आणि डंपरची विमा कंपनी असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीच्या विरोधात अॅड. सुनीता नवले यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. घाडगे यांचे मृत्यूसमयी २७ वय होते. त्यांना दरमहा २५ हजार रुपये पगार होता, या गोष्टींचा विचार करून ६५ लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, असा दावा अॅड. नवले यांनी जून २०१६ मध्ये येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दाखल केला होता. रविवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये ५१ लाख रुपये देत हा दावा निकाली काढण्यात आला. अर्जदाराच्या वकील अॅड. सुनीता नवले, आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीच्या वतीने अॅड. हृषीकेश गानू आणि लिगल आॅफिसर संकल्प प्रभाकर यांनी निकालासाठी महत्वाची भूमिका निभावली.