पालिकेतील सत्ताधारी भाजपमधील पदांची स्पर्धा संपेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:09 AM2021-06-28T04:09:17+5:302021-06-28T04:09:17+5:30
पुणे : पालिकेतील सत्ताधारी भाजपमधील मातब्बरांमध्ये शह-काटशहचे राजकारण सुरू असून, महत्त्वाच्या पदांवरील स्पर्धा संपत नसल्याचे चित्र आहे. यामुळेच पीएमपीएमएलच्या ...
पुणे : पालिकेतील सत्ताधारी भाजपमधील मातब्बरांमध्ये शह-काटशहचे राजकारण सुरू असून, महत्त्वाच्या पदांवरील स्पर्धा संपत नसल्याचे चित्र आहे. यामुळेच पीएमपीएमएलच्या संचालक पदावर नवीन सदस्याची नेमणूक करण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे इच्छुक नगरसेवक नाराज झाले आहेत.
पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका येत्या फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने मतदार याद्या, सर्वेक्षण आदी प्रक्रिया करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. पालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पुणेकरांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील कोथरूड मतदार संघातून निवडून आणल्यानंतर शहराच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आपसूकच या मतदार केंद्रावर सरकला. शहर भाजपमध्येही बघता बघता पाटील यांचा प्रभावी गट निर्माण झाला. या गटाची परिणामकारकता मोठी असल्याने शहर भाजपमध्ये ''दादा युग'' आल्याचेही बोलले जाऊ लागले. पालिकेतील महत्त्वाच्या पदांवरही दादांच्या मर्जी संपादन केलेल्या नगरसेवकांना संधी मिळाली.
परंतु, तरीदेखील पदांमधील स्पर्धा संपलेली नाही. पीएमपीचे संचालक शंकर पवार यांच्या राजीनाम्यावरून झालेल्या गोंधळावरून हे समोर आले. पक्षात सर्व आलबेल नसल्याने माजी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पदाधिकाऱ्यांचे कान टोचले आहेत.
पीएमपीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला गेल्यानंतर, २० दिवसांपेक्षा अधिक कालावधी झालेला असतानाही या पदावर नवीन सदस्याची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. आधी स्थायी समिती अध्यक्ष, नंतर उपमहापौरपदाच्या नेमणुकीत हा गोंधळ झाला होता. आता पीएमपी संचालकपदाच्या नेमणुकीत जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे.